जनशिक्षण संस्थानतर्फे ८० जणांना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण*
मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हा : हेमलता बिडकर*

*जनशिक्षण संस्थानतर्फे ८० जणांना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण*
———————————–
*मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हा : हेमलता बिडकर*
———————————–
*नाशिक :जन्मत जनजातीय कौशल्य विकासांतर्गत युवक-युवतींना देण्यात येणारे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून, प्रशिक्षणातून प्राप्त कौशल्यांचा उपयोग करून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात व स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर यांनी केले.
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकारचे जनजातीय कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, नाशिक आणि मविप्र समाजाचे जनशिक्षण संस्थान यांच्या वतीने कालवण तालुक्यातील अभोणा येथील डांग सेवा मंडळ संचलित दादासाहेब बिडकर महाविद्यालयात आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जनशिक्षण संस्थानचे संचालक राहुल ठाकरे, व्यवस्थापन मंडळ सदस्या अॅड. मनीषा भामरे, प्राचार्य, डॉ. एन. बी. कोठावदे, चंद्रशेखर जोशी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दत्तात्रय भोकनळ, वैष्णवी हेमाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जनजातीय समाजातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणार्थींना विविध व्यावसायिक व तांत्रिक कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा लाभ एकूण ८० प्रशिक्षणार्थींनी घेतला, अशी माहिती जनशिक्षण संस्थानचे संचालक राहुल ठाकरे यांनी दिली. यापुढील काळात प्रशिक्षणार्थींच्या रोजगार व व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, ई.व्ही. टेक्निशियन, क्लाऊड किचन तसेच इतर विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा समावेश राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. एन. बी. कोठावदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध प्रशिक्षणांची माहिती दिली. तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व युवकांना रोजगाराभिमुख कौशल्ये उपलब्ध करून देण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. अॅड. मनीषा भामरे यांनी प्रशिक्षणातून प्राप्त केलेल्या कौशल्यांचा दैनंदिन जीवनात तसेच रोजगार व व्यवसायामध्ये कसा उपयोग करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन त्यांनी प्रशिक्षणार्थींना केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या ८० प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या कौशल्यांचा उपयोग रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी करावा, असे आवाहन मान्यवरांनी केले. या कार्यक्रमासाठी जनशिक्षण संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. हर्षदा राजभोज यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी एल. के. बागूल यांनी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
———————————–
*नाशिक : कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण सोहळ्याप्रसंगी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, जनशिक्षण संस्थानचे संचालक राहुल ठाकरे, अॅड. मनीषा भामरे, प्राचार्य, डॉ. एन. बी. कोठावदे, चंद्रशेखर जोशी, दत्तात्रय भोकनळ, वैष्णवी हेमाडे आदी मान्यवरांसह प्रशिक्षणार्थी.* उपस्थित होते



