जंक्शन सुधारणेसाठी मनपाची कार्यवाही सुरू; तांत्रिक सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पुढे वाहतूक कोंडी व अपघात कमी करण्यासाठी प्रमुख जंक्शनचा शास्त्रीय पद्धतीने होणार विकास
जंक्शन सुधारणेसाठी मनपाची कार्यवाही सुरू; तांत्रिक सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पुढे
वाहतूक कोंडी व अपघात कमी करण्यासाठी प्रमुख जंक्शनचा शास्त्रीय पद्धतीने होणार विकास
नाशिक : जन्मत शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने प्रमुख जंक्शनच्या सुधारणेसाठी कार्यवाही सुरू केली आहे. जंक्शन सुधार आराखडा (Junction Improvement Plan) तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार संस्था नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू असून, या आराखड्यानुसार प्रमुख जंक्शनचा विकास करण्यात येणार आहे.
वाढती वाहतूक आणि अपूर्ण जंक्शन रचना यांमुळे शहरात वाहतूक कोंडी आणि नागरिकांचा प्रवासवेळ वाढत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी महत्त्वाच्या जंक्शनचा वैज्ञानिक पद्धतीने विकास करणे आवश्यक असून, सल्लागार संस्थेमार्फत भारतीय रस्ते काँग्रेसच्या (IRC) मानकांनुसार जंक्शनचे आरेखन व अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या आराखड्याच्या माध्यमातून पुढील बाबींवर भर देण्यात येणार आहे :
• वाहतूक सुरळीत व सुरक्षित करणे
• पादचारी व सायकलस्वारांचे संरक्षण
• सिग्नल व पार्किंग व्यवस्था सुलभ करणे
• अपघातप्रवण ठिकाणांचे (Black spot) निराकरण करणे
नियुक्त सल्लागार संस्था प्रत्येक जंक्शनची पुढीलप्रमाणे कार्यवाही करून सुधार आराखडा तयार करेल :
1. प्रत्यक्ष पाहणी
2. वाहतूक सर्वेक्षण व विश्लेषण
3. पुढील १० वर्षांतील वाहतूक आणि वाहनांच्या संख्येचा अंदाज वर्तवणे आणि त्यानुसार IRC norms नुसार Road Safety Audit समावेश करून आरखडा तयार करणे
4. १० वर्षांच्या अंदाजानुसार तयार केलेल्या ट्रॅफिक मॅप्सचे मायक्रो-सिम्युलेशन (micro-simulation) करणे
आराखडा तयार करताना पादचारी सुविधा, सिग्नल यंत्रणा, बसथांबे, पावसाळी पाण्याचा निचरा, पथदिवे, सायकल मार्ग तसेच सीसीटीव्ही, सेन्सर्स व काउंटडाउन टायमर यांसारख्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा विचार करण्यात येणार आहे.
दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये वाहनप्रकार व शहराच्या घनतेनुसार जंक्शनचा डिझाईन वेग निश्चित करणे आणि वाहतूक प्रवाहाच्या सुरक्षिततेसाठी दुभाजक , ट्रॅफिक आयलंड व चॅनेलायझेशन (Channelisation) करणे यांचा समावेश असेल. नियोजनामध्ये अशा प्रकारे विशेष लक्ष दिले जाईल की जंक्शन सिग्नलमुक्त असतील आणि डावीकडील वळणे वाहतुकीसाठी मुक्त असतील.तसेच वाहतुकीच्या संख्येनुसार बदलणाऱ्या अडॅप्टिव्ह सिग्नल प्रणालीचा (Adaptive Signal System) अवलंब, पादचाऱ्यांसाठी क्रॉसवॉक व रिफ्यूज आयलंड, अपघात टाळण्यासाठी पुरेशी दृश्यता (Visibility Splay), सार्वजनिक वाहतुकीच्या समन्वयासाठी सायकल ट्रॅक व पदपथ (Footpaths) यांच्या एकात्मिक नियोजनावर भर देण्यात येणार आहे.
अंतिम आराखडा निश्चित करण्यापूर्वी आवश्यकतेनुसार बॅरिकेड्स व तात्पुरत्या चिन्हांकनाद्वारे प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येईल. यासाठी शहर वाहतूक पोलीस व मनपा अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जाईल. जंक्शनचे काम पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांनी वाहतुकीचे पुनर्मूल्यांकन करून अहवाल सादर करण्यात येईल.

