मविप्र होरायझन अकॅडमीच्या नूतन इमारतीचे दिमाखात उद्घाट
विद्यार्थी हाच शिक्षणप्रक्रियेचा केंद्रबिंदू : अॅड. नितीन ठाकरे

*मविप्र होरायझन अकॅडमीच्या नूतन इमारतीचे दिमाखात उद्घाट
*विद्यार्थी हाच शिक्षणप्रक्रियेचा केंद्रबिंदू : अॅड. नितीन ठा
नासिक जनमत सिन्नर :* गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करून त्यांना जबाबदार नागरिक बनविण्याचा प्रयत्न मविप्र संस्थेचे शिक्षक करत असतात. विद्यार्थी हाच शिक्षणप्रक्रियेचा केंद्रबिंदू असल्याचे सांगत संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी शाळेची प्रगती पाहता शिक्षक व प्राचार्यांचे कौतुक केले.
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित सिन्नर येथील होरायझन अकॅडमीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा गुरुवार दि. २२ रोजी दिमाखात संपन्न झाला. सरचिटणीस मा. अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन व शिलावरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक स्वागत नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. या सोहळ्यास उद्योजक प्रकाश वाजे, खासदार राजाभाऊ वाजे, संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी यांच्यासह सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत, सर्व तालुका संचालक मंडळ, सेवक सदस्य व शिक्षणाधिकारी, शालेय समिती सदस्य, संस्थेच्या इतर शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागतगीत व समाजगीतानंतर प्राचार्य नितीश नायर यांनी नवीन इमारतीच्या उभारणीमागील प्रवास उलगडून सांगितला. तसेच शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी नूतन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून नूतन इमारतीमुळे शैक्षणिक प्रगतीला अधिक बळ मिळेल, असे मत व्यक्त केले.
उद्योजक प्रकाशशेठ वाजे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संचालक मंडळाचे आभार मानले. होरायझन अकॅडमीमध्ये प्रवेशासाठी पालकांकडून असलेली मागणी ही शाळेच्या गुणवत्तेची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थिनी निधी गुजराती हिने अॅड. नितीन ठाकरे, खासदार राजाभाऊ वाजे आणि प्रकाशशेठ वाजे यांची स्केचेस तयार करून त्यांना भेट दिली. तिच्या कलागुणांचे मान्यवरांनी कौतुक केले.
शिक्षिका पल्लवी गुजराती व अर्चना गीते यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्येष्ठ शिक्षिका नीता सोनवणे यांनी आभार मानले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
