पावसाळ्यातील सर्दी, तापाच्या आजारांबाबत नागरिकांनी घाबरू नये कळवणचे बालरोग तज्ज्ञ डॉ. जनक पूरकर यांचे आवाहन

पावसाळ्यातील सर्दी, तापाच्या आजारांबाबत नागरिकांनी घाबरू नये
कळवणचे बालरोग तज्ज्ञ डॉ. जनक पूरकर यांचे आवाहन
नाशिक, दि. ५ सप्टेंबर, २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : पावसाळ्यातील वातावरणामुळे सर्दी, खोकला व तापाचे आजार होणे सर्वसाधारण बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. रुग्णालयात दाखल असलेली आश्रमशाळेतील सर्व बालके सुरक्षित असून, कोणतेही बालक अत्यवस्थ नाही, अशी माहिती कळवण उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. जनक पूरकर यांनी दिली आहे.
डॉ. पूरकर यांनी सांगितले की, कालपासून रुग्णालयात आठ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील बालकांमध्ये सर्दी व तापाची लक्षणे आढळून आली आहेत. सध्या साधारण २४ बालके उपचारासाठी दाखल आहेत. या आजाराचे स्वरूप प्रामुख्याने हवेतून पसरणाऱ्या संसर्गाशी संबंधित असून, पावसाळ्यातील थंड व दमट वातावरणात अशा आजारांचे प्रमाण वाढणे सामान्य आहे.
सर्व दाखल बालकांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी अनावश्यक भीती बाळगू नये. तालुक्यात कोणताही वेगळा किंवा गंभीर आजार पसरत असल्याचे समजून घेण्याचे कारण नाही, असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यात सर्दी, खोकला व तापाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत, असेही आवाहन डॉ. पूरकर यांनी केले आहे.
०००००



