ब्रेकिंग

रामतीर्थावर महामहिम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत गोदापूजन व जनजातीय सिंहस्थ महाआरतीचा भव्य सोहळा

सर्व समाजांतील महिलांचे पुरोहित म्हणून नेतृत्व; सामाजिक समरसता, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

रामतीर्थावर महामहिम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत गोदापूजन व जनजातीय सिंहस्थ महाआरतीचा भव्य सोहळा

 

सर्व समाजांतील महिलांचे पुरोहित म्हणून नेतृत्व; सामाजिक समरसता, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

 

नाशिक जनमत ,

 

सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रामतीर्थ येथे गोदापूजन व जनजातीय सिंहस्थ महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती लाभणार असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मान्यवर सदस्य, तेरा आखाड्यांतील संत-महंत, जगद्गुरू, शंकराचार्य तसेच विविध आध्यात्मिक परंपरांतील मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने देण्यात आली.

सर्व समाजांतील महिलांचे पुरोहित म्हणून नेतृत्व हे महाआरतीचे प्रमुख वैशिष्ट्य

 

या महाआरतीचे सर्वांत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजघटकांतील महिला पुरोहित म्हणून गोदावरी मातेच्या पूजनविधीचे पौरोहित्य करणार आहेत. धार्मिक विधींचे निवेदन, पूजनविधीचे मार्गदर्शन आणि महाआरतीचे नेतृत्व अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या महिला पार पाडणार आहेत. श्रद्धा, ज्ञान, साधना आणि सेवाभाव यांच्या माध्यमातून महिला धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यात मोलाचे योगदान देऊ शकतात, हा व्यापक संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

 

महिलांना धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सन्मानाचे स्थान देतानाच त्यांच्या नेतृत्वक्षमतेचा गौरव करणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा विचार आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान, समानतेची भावना आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संकल्प या सोहळ्यातून अधोरेखित होणार आहे.

 

जनजातीय संस्कृतीचा गौरव आणि सामाजिक समरसतेचा संकल्प

 

जनजातीय बांधवांचा सन्मानपूर्ण सहभाग हे या आयोजनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. निसर्ग, जलस्रोत आणि पर्यावरणाशी असलेले त्यांचे अतूट नाते लक्षात घेऊन त्यांच्या सांस्कृतिक परंपरांचा गौरव करण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा सन्मान राखत सर्वांनी एकात्मतेने पुढे जावे, ही भावना या महाआरतीच्या माध्यमातून व्यक्त होणार आहे.

 

विविध समाजघटक, महिला, जनजातीय बांधव, संत-महंत आणि आध्यात्मिक परंपरांतील मान्यवर यांना एकाच व्यासपीठावर जोडणारा हा सोहळा सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरणार आहे.

 

गोदावरी मातेच्या पूजनातून पर्यावरणसंवर्धनाचा संदेश

 

गोदावरी ही केवळ नदी नसून कोट्यवधी लोकांची श्रद्धा, संस्कृती आणि जीवन यांना जोडणारी जीवनदायिनी माता आहे. गोदावरी मातेचे पूजन करणे म्हणजे तिचे पावित्र्य जपणे, नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आणि जलस्रोतांच्या संवर्धनाचा संकल्प करणे होय.

 

शासनाचे नेतृत्व, संतपरंपरा, महिला आणि समाजातील विविध घटक यांच्या सामूहिक सहभागातून गोदावरी सेवेची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच भाविकांमध्ये पर्यावरण आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

 

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित हा सोहळा श्रद्धा, सेवा, स्त्रीशक्तीचा सन्मान, जनजातीय संस्कृतीचा गौरव, सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा सुंदर संगम घडविणारा ठरणार आहे.

 

“गोदावरी माता सर्वांची, तिची सेवा सर्वांची आणि तिच्या साक्षीने समाजातील प्रत्येक घटकाला आत्मीयतेने जोडणे, हीच खरी सामाजिक समरसता!” हा संदेश या महाआरतीच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

 

पत्रकार परिषदेस उपस्थित समितीचे पदाधिकारी व सदस्य

 

या पत्रकार परिषदेस रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, सचिव मुकुंद खोचे, उपाध्यक्ष नरसिंहकृपा प्रभू, भक्तीचरणदास महाराज, धनंजय बेळे, चिराग पाटील, शिवाजी बोंदारडे, राजेंद्र फड (नाना) आणि आशिमा केला, अभय नेरकर उपस्थित होते.

 

—

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे