नाशिक शहराचे पहिले पोलिस आयुक्त . कमल कृष्ण कश्यप याचे निधन.

नाशिक शहराचे पहिले पोलीस आयुक्त आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक स्व. कमल कृष्ण कश्यप यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. नाशिक शहरात पोलीस आयुक्तालय व्यवस्थेची भक्कम पायाभरणी करून आधुनिक, सक्षम आणि नागरिकाभिमुख पोलीस प्रशासनाची दिशा देणारे दूरदृष्टीचे अधिकारी म्हणून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
के. के. कश्यप यांनी नोव्हेंबर १९९० मध्ये नाशिकच्या पहिल्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. १९९१-९२ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी त्यांनी चोखपणे बजावत नाशिकमधील ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडला. या मोठ्या सोहळ्याचे नियोजन करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त म्हणून कश्यप आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही महत्त्वपूर्ण प्रशासकीय समन्वय साधला. कश्यप हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि कायद्याच्या चोख अंमलबजावणीसाठी ओळखले जात होते. त्यांनी कधीही राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासकीय स्वायत्तता जपली आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यांच्या या कार्यामुळे नाशिकच्या पोलीस प्रशासनाला नवी ओळख मिळाली. त्यांच्या शिस्तबद्ध, धाडसी आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे नाशिक शहरात पोलीस आयुक्तालय व्यवस्था यशस्वीपणे रुजली. सन २००४ ते २००५ या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय होते.
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करणारे स्व. कमल कृष्ण कश्यप यांचे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना.



