ब्रेकिंग

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाचे विशेष कार्यपथक सक्रिय. नालेसफाई, रस्ते दुरुस्ती आणि आपत्कालीन.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाचे विशेष कार्यपथक सक्रिय

  1. नालेसफाई, रस्ते दुरुस्ती आणि आपत्कालीन उपाययोजनांसाठी विभागीय समन्वयाला गती

नाशिक:जनमत आगामी सिंहस्थ कुंभमेळा विकासकामे तसेच येणारा पावसाळा लक्षात घेता नाशिक महानगरपालिका प्रशासनाने शहरातील विविध विभागांचा समन्वय साधत विशेष कार्यपथक कार्यान्वित केले आहे. पावसाळ्यात शहरात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे, झाडे अथवा फांद्या पडून जीवित व वित्तहानी होणे तसेच संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी विविध विभागांच्या समन्वयातून शहरातील आवश्यक दुरुस्ती आणि प्रतिबंधात्मक कामांना गती देण्यात आली आहे. यामध्ये बांधकाम, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान तसेच अतिक्रमण विभागांचा समावेश असून, सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या मोहिमेअंतर्गत शहरातील नाले, गटारी आणि आरसीसी पाईप लाईनची साफसफाई, पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी निचऱ्याची व्यवस्था, विविध रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच एमएनजीएल, ऑप्टिकल फायबर, दूरसंचार, वीज, पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांसाठी खोदण्यात आलेले रस्ते तातडीने पूर्ववत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कामांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जेसीबी, टिप्पर, क्रेन यांसारखी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार असून, विभागीय समन्वय राखण्यासाठी विशेष कार्यपथक स्थापन करण्यात आले आहे.

“आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने शहरात सुरू असलेली विकासकामे आणि येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी पूर्ण समन्वयाने, जबाबदारीने आणि युद्धपातळीवर काम करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांची सुरक्षितता, शहरातील मूलभूत सेवा आणि कामांची गुणवत्ता याबाबत कोणतीही हलगर्जी किंवा दिरंगाई सहन केली जाणार नाही. प्रत्येक विभागाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत,” असे नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित विभागांसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व त्यांचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे:

 

 

 

 

विभाग

नोडल अधिकारी

मोबाईल क्रमांक

पंचवटी विभाग

राहुल जाधव

८०१०४६२८१६

नाशिक पूर्व विभाग

हेमंत झुटे

९६८९७५८५९५

नाशिक पश्चिम विभाग

चंदन घुगे

८८८८३२४८४९

सातपूर विभाग

प्रज्ञा त्रिभुवन

९६०७१३०११०

सिडको विभाग

नानासाहेब साळवे

९९२२४११८४७

नाशिक रोड विभाग

सुनील राजभोज

७७९८६४४४११ /८९९९६१४०७३

 

 

यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित समन्वयक अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सातत्याने समन्वय राखून कामकाज सुरळीत पार पाडणे आवश्यक राहणार आहे. प्रत्येक विभागातील नियुक्त अधिकारी हे त्यांच्या संबंधित प्रभागांतील कामकाज, अंमलबजावणी व जबाबदाऱ्यांसाठी उत्तरदायी राहतील. तसेच संबंधित समन्वयक अधिकाऱ्यांनी दररोज सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांच्या विभागातील दिवसभरातील कामांचा सविस्तर अहवाल शहर अभियंता यांच्याकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात देण्यात आलेल्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, आदेशांचे पालन करण्यात कोणतीही हलगर्जी अथवा दुर्लक्ष आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे