त्र्यंबक नाका ते बॉश सर्कल आणि आयटीआय सिग्नल ते सातपूर गाव काँक्रीट रस्ता अंतिम टप्प्यात; लवकरच नागरिकांसाठी होणार खुला.

त्र्यंबक नाका ते बॉश सर्कल आणि आयटीआय सिग्नल ते सातपूर गाव काँक्रीट रस्ता अंतिम टप्प्यात; लवकरच नागरिकांसाठी होणार खुला
नाशिक:जनमत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही स्थळांना जोडणारा त्र्यंबक रोड हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून या मार्गावरील व्हाईट टॉपिंगद्वारे काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. खडकाळी ते आयटीआय तसेच आयटीआय ते मनपा हद्दीपर्यंत सुरू असलेल्या रस्ता प्रकल्पांतर्गत त्र्यंबक नाका ते बॉश सर्कल आणि आयटीआय सिग्नल ते सातपूर गाव या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले असून सदर मार्ग लवकरच नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे.
या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री यांनी आज स्थळाला भेट देऊन संबंधित कंत्राटदारांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
रस्त्याच्या गुणवत्तेची करण्यात आलेल्या तपासणीत अपेक्षित किमान १८० मिमी काँक्रीट जाडीच्या तुलनेत प्रत्यक्षात १८५ मिमी जाडी आढळून आली. या प्रकल्पात बॉन्डेड व्हाईट टॉपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून विद्यमान डांबरी रस्त्यावरच काँक्रीटचा नवीन थर विकसित करण्यात येत आहे.
आयुक्तांनी संबंधित कंत्राटदारांना तातडीने अंतिम कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार आवश्यक काम सुरू करण्यात आले आहे. सध्या रस्त्याची स्वच्छता तसेच अंतिम तांत्रिक प्रक्रिया सुरू असून काम पूर्ण होताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
यावेळी आयुक्त मनिषा खत्री म्हणाल्या, “महानगरपालिकेकडून शहरातील सर्व रस्ते विकास कामांमध्ये गुणवत्ता आणि टिकाऊपणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य असून अंतिम प्रक्रिया पूर्ण होताच हा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल.”
शहरातील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेता हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून रस्ता सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


