नाशिकमध्ये मान्सूनपूर्व डेंग्यू प्रतिबंधासाठी मनपाची उच्चस्तरीय व्यापक मोहीम
६२ विशेष प्रतिबंध पथके तैनात; हॉटस्पॉट भागांमध्ये सघन तपासणी, दररोज अळीनाशक फवारणी आणि जनजागृतीला वेग

- नाशिकमध्ये मान्सूनपूर्व डेंग्यू प्रतिबंधासाठी मनपाची उच्चस्तरीय व्यापक मोहीम
६२ विशेष प्रतिबंध पथके तैनात; हॉटस्पॉट भागांमध्ये सघन तपासणी, दररोज अळीनाशक फवारणी आणि जनजागृतीला वेग
नाशिक : जनमत आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाकडून शहरभर डेंग्यू आणि मलेरिया प्रतिबंधासाठी सघन आणि व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू संवेदनशील भाग, पूर्वी रुग्ण आढळलेले क्लस्टर्स तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
यासाठी आरोग्य विभागाकडून ६२ विशेष “डेंग्यू प्रतिबंध पथके” कार्यरत करण्यात आली असून ही पथके घराघरांत तपासणी, अळी शोध मोहीम, पाण्याचे स्रोत पडताळणी, फॉगिंग, औषध फवारणी तसेच जनजागृती उपक्रम राबवत आहेत. मागील वर्षी ज्या विभागांमध्ये अतिरिक्त प्रादुर्भाव आढळला अश्या भागांमध्ये विशेष दक्षता घेण्यात येत आहे
रिकामे प्लॉट, बांधकामस्थळे, बेसमेंट, स्क्रॅप डेपो, टायर दुकाने, छतावरील पाण्याच्या टाक्या आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची विशेष तपासणी करण्यात येत असून अळी आढळणाऱ्या ठिकाणी तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचाही इशारा महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाकडून शहरभर धूर फवारणी, फॉगिंग, अळीनाशक फवारणी तसेच पाण्याचे स्रोत रिकामे करण्याची मोहीम अधिक वेगाने सुरू असून नागरिकांच्या सहभागातून “डेंग्यूमुक्त नाशिक”साठी व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि प्रशासनाच्या नियोजनबद्ध मोहिमेमुळे प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रभावीपणे राबविले जात आहेत.
मान्सूनपूर्व तपासणी (एप्रिल २०२६)
घटक
संख्या
एकूण घरे तपासली
१,९४,७९८
अळी आढळली
९५१ घरे
पाण्याचे स्रोत तपासले
२,२८,५३३
स्रोतांमध्ये अळी आढळली
१,४०४
महानगरपालिकेच्या उपाययोजना
उपाययोजना
संख्या
फॉगिंग / फवारणी
३८,५५१ ठिकाणी
पाण्याचे स्रोत रिकामे केले
१,११५
अबेट औषध उपचार
२८९ स्रोतांवर
गप्पी मासे सोडले
६७४ ठिकाणी
डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाकडून विविध अळीनाशक औषधांचा नियोजनबद्ध वापर करण्यात येत असून संबंधित ठिकाणांनुसार खालीलप्रमाणे औषध फवारणी आणि उपचार केले जात आहेत.
अळीनाशक औषधांचा वापर
औषध
प्रकार
मात्रा
वापरायची ठिकाणे
एम.एल.ओ.
अळीनाशक
जसे आहे तसे
डबके, सेप्टिक टँक, नाले, घाणपाणी, बेसमेंट
डायफ्ल्युबेंझुरॉन डब्ल्यू.पी.
अळीनाशक
100 ग्रॅम / 10 लिटर
डबके, सेप्टिक टँक, नाले, घाणपाणी, बेसमेंट
टेमीफोस 50% ई.सी.
अळीनाशक
5 मिली / 10 लिटर
स्वच्छ पाण्याचे टाके, नदी, विहीर
नागरिकांना मनपाचे आवाहन
घराभोवती पाणी साचू देऊ नये
पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात
आठवड्यातून एकदा “Dry Day” पाळावा
डेंग्यूची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा
“आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय अधिक तीव्र करण्यात येत आहेत. नाशिककरांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि महानगरपालिकेच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे,” असे आवाहन आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे.



