सिंहस्थपूर्व तयारीला वेग; पूर्व विभागातील घाट मार्गांवरील कामे अंतिम टप्प्यात.

सिंहस्थपूर्व तयारीला वेग; पूर्व विभागातील घाट मार्गांवरील कामे अंतिम टप्प्यात
६.३४३ किमी मार्गांवर युटिलिटी सुविधा उभारणी; पावसाळ्यापूर्वी प्रमुख कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
नाशिक :जनमत 
आगामी सिंहस्थ कुंभमेळा, वाढती वाहतूक आणि पावसाळ्यापूर्वीची तयारी लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेकडून पूर्व विभागातील दोन महत्त्वाच्या घाट मार्गांवरील युटिलिटी कामांना वेग देण्यात आला आहे. लेखानगर एनएच-३ ते कलानगर चौक, वडाळागाव, रवीशंकर मार्ग ते विजय ममता चौक या सुमारे ४.२९० किलोमीटर लांबीच्या मार्गासह विजय ममता चौक ते टाकळी गाव ते संगम पूल या २.०५३ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील विविध सुविधा उभारणीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.
पावसाळ्यापूर्वी सर्व प्रमुख कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. हे दोन्ही मार्ग घाट परिसर, साधुग्राम तसेच वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
पहिल्या मार्गावर ऑप्टिकल फायबर केबल, महा आयटी सीसीटीव्ही, एमएनजीएल गॅस पाइपलाइन, सांडपाणी वाहिनी, पाणीपुरवठा वाहिन्या आणि पर्जन्यजल वाहिन्यांची कामे सुरू आहेत. यापैकी सांडपाणी वाहिनी आणि नियमित पाणीपुरवठा वाहिनीची कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. ऑप्टिकल फायबर आणि गॅस पाइपलाइनची कामेही पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुकणे-गंगापूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून त्यामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे.
दुसऱ्या मार्गावर ऑप्टिकल फायबर व सीसीटीव्हीचे काम पूर्ण झाले असून पर्जन्यजल वाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाळ्यात पाणी साचू नये आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी पर्जन्यजल वाहिनीच्या कामांना विशेष प्राधान्य देण्यात येत आहे.
महापालिका प्रशासनाच्या मते, या दोन्ही मार्गांवरील युटिलिटी कामे पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील रस्ते विकास, वाहतूक व्यवस्थापन आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाला मोठी मदत होणार आहे. विशेषकरून, देशभरातून येणार्या भाविकांना कुंभमेळ्यात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी या कामांचा दर्जा उच्च राखला जात आहे.
यासाठी महापालिका प्रशासन आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांमधील समन्वय साधून उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करीत आहे.
महत्त्वाचे मुद्दे
• पूर्व विभागात दोन प्रमुख घाट जोडणाऱ्या मार्गांवरील कामांना गती
• एकूण सुमारे ६.३४३ किलोमीटर मार्गांवर युटिलिटी सुविधा उभारणी
• ओएफसी व महा आयटी सीसीटीव्हीची बहुतांश कामे पूर्ण
• एमएनजीएल गॅस पाइपलाइन अंतिम टप्प्यात
• मुकणे-गंगापूर पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू
• पावसाळ्यापूर्वी पर्जन्यजल वाहिन्यांवर विशेष भर
कामांची सद्यस्थिती
लेखनगर एनएच-३ – कलानगर चौक – वडाळागाव – रवीशंकर मार्ग – विजय ममता चौक (घाट सोबत जोडणारे मार्ग)
कामाचे स्वरूप
सद्यस्थिती
मार्ग लांबी
४,२९० मीटर
ओएफसी व महा आयटी सीसीटीव्ही
१०० टक्के पूर्ण
एमएनजीएल गॅस पाइपलाइन
काम प्रगतीपथावर.
सांडपाणी वाहिनी
१०० टक्के पूर्ण.
पाणीपुरवठा
१०० टक्के पूर्ण
मुकणे/गंगापूर पाणीपुरवठा
काम प्रगतीपथावर
पर्जन्यजल वाहिनी
काम प्रगतीपथावर
विजय ममता चौक – टाकळी गाव – संगम पूल (साधुग्राम संपर्क मार्ग)
कामाचे स्वरूप
सद्यस्थिती
मार्ग लांबी
२,०५३ मीटर
ओएफसी व सीसीटीव्ही
१०० टक्के पूर्ण.
पाणीपुरवठा
काम प्रगतीपथावर.
पर्जन्यजल वाहिन
काम प्रगतीपथावर.

आतापर्यंत करण्यात आलेल्या रस्ते कामात नाशिककरांना समोर ठेवून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही याचा सारासार विचार करण्यात आला आहे. सिंहस्थ उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी तसेच नाशिकचा त्यादृष्टीने विकास करण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे.
–



