ब्रेकिंग

दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क: कचऱ्यातून साकारला जाणार सांस्कृतिक वारसा

दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क: कचऱ्यातून साकारला जाणार सांस्कृतिक वारसा

पर्यावरण संवर्धन, कला आणि पर्यटन विकासाचा संगम; नाशिकला मिळणार नवे आकर्षण केंद्र

नाशिक : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृती जपत नाशिकमध्ये “दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क” उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धन, कला आणि सांस्कृतिक विकास यांचा संगम साधणारा हा प्रकल्प शहरासाठी नवे आकर्षण केंद्र ठरणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

या प्रकल्पामध्ये शहरातील विविध प्रकारच्या कचऱ्याचा, टाकाऊ वस्तूंचा वापर करून पुनर्वापर करून आकर्षक कला स्थापत्ये उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही मदत होणार आहे. “सर्क्युलर इकॉनॉमी” या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प दादासाहेब फाळके यांच्या वारशाचे जतन करत सांस्कृतिक व मनोरंजन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

 

प्रकल्पासाठी बांधकामातील पुनर्वापरयोग्य अवशेष, प्लास्टिक कचरा, सेंद्रिय उपपदार्थ तसेच इतर पुनर्वापरयोग्य शहर कचऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. या साहित्यांपासून टिकाऊ व आकर्षक कलाकृती तयार करून त्या पार्कमध्ये उभारल्या जाणार आहेत.

या प्रकल्पामुळे कचरा विल्हेवाटीवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून पुनर्वापर संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे. पर्यावरण संवर्धन, शाश्वत शहरी विकास आणि सक्षम कचरा व्यवस्थापनाला चालना देतानाच हे ठिकाण आधुनिक सांस्कृतिक व विरंगुळा केंद्र म्हणून विकसित होणार आहे.

 

 

पार्कमध्ये खुल्या जागेतील कलादालने, सर्जनशील कला स्थापत्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागा, कुटुंबांसाठी मनोरंजन सुविधा तसेच पर्यावरण जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

याशिवाय या प्रकल्पामुळे स्थानिक कारागीर आणि कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षणाची संधी निर्माण होणार आहे. स्थानिक रोजगारनिर्मितीसह सामाजिक सहभाग वाढविण्यासही या प्रकल्पाची मदत होणार आहे.

 

आर्थिक बाब

रक्कम

प्रकल्प खर्च

₹६.३७ कोटी

पीपीपी हिस्सा

₹१.२७ कोटी

मनपा / राज्य हिस्सा

₹३.५१ कोटी

यूसीएफ हिस्सा (२५%)

₹१.५९ कोटी

 

 

 

 

 

 

“महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री म्हणाल्या, “पूर्वी अशा प्रकारचे उपक्रम मर्यादित कालावधीसाठी म्हणजे चार ते पाच महिन्यांपर्यंतच प्रभावी ठरत होते. मात्र, ‘दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क’ हा प्रकल्प दीर्घकालीन दृष्टीकोनातून विकसित करण्यात येत असून, पुढील २० वर्षे टिकणारा आणि सातत्याने जपला जाणारा शाश्वत प्रकल्प ठरणार आहे. हा प्रकल्प नाशिकच्या फाळके स्मारक चे काम येत्या वर्षभरात व वेस्ट टू वंडर पार्क नागरिकांसाठी मान्सून नंतर खुले होणार .

. महापालिका प्रशासनाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून, लवकरच नाशिककरांना चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने साकारण्यात येणाऱ्या या कलात्मक उद्यानाची ‘चंदेरी दुनिया’ अनुभवता येणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे