योग ही निरोगी, सशक्त आणि सकारात्मक जीवनाची गुरुकिल्ली* :- मंत्री गिरीश महाजन .

*योग ही निरोगी, सशक्त आणि सकारात्मक जीवनाची गुरुकिल्ली* :- मंत्री गिरीश महाजन
———————–
—————-
नाशिक, दि. २१ : भारताच्या ऋषी-मुनींनी जगाला दिलेली योग ही अमूल्य देणगी आज संपूर्ण जगाने स्वीकारली असून योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारी जीवनशैली आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ७ वाजता भोईर मळा, महादेव कॉलनी समोर, मखमलाबाद रोड येथे नाशिक महानगरपालिका व कुंभमेळा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
हयावेळी बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, योगाचे महत्त्व केवळ भारतापुरते मर्यादित राहिलेले नाही. आज जगातील जवळपास प्रत्येक देशामध्ये योगाचा प्रसार झाला आहे. याचे मोठे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जाते. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आणि भारताच्या या प्राचीन परंपरेला जागतिक मान्यता मिळाली. आज जगभरातील कोट्यवधी लोक योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा मार्ग स्वीकारत असून भारताने जगाला ‘स्वास्थ्य, शांती आणि संतुलन’ यांचा संदेश दिला आहे. ते पुढे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, नैराश्य, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत योग हा सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न राहते, विचार सकारात्मक होतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक बनतो. योग आपल्याला केवळ शारीरिक ताकद देत नाही, तर मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि आत्मशक्तीही प्रदान करतो. त्यामुळे योग हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. विशेषतः युवा पिढीने योगाला जीवनशैली म्हणून स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी *महापौर हिमगौरी आडके* म्हणाल्या की, भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी निरोगी, सक्षम आणि सकारात्मक समाजाची आवश्यकता आहे. योग हीच त्या निरोगी समाजाची भक्कम पायाभरणी आहे. प्रत्येक नागरिक निरोगी असेल तर देश अधिक सक्षम होईल आणि विकासाचा वेग अधिक वाढेल. योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षातील प्रत्येक दिवस योगाचा दिवस बनविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजात योगाबाबत जनजागृती करून प्रत्येक घरात, गावात आणि शहरात योगाचा संदेश पोहोचविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास व्यासपीठावर महापौर हिमगौरी आडके, अतिरिक्त आयुक्त प्रभात रंजन, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते श्याम बडोदे,नगरसेवक वाळू काकड, रूपाली ननावरे, रोहिणी पिंगळे, आदिती पांडे, उद्धव निमसे, सुरेश आण्णाजी पाटील, दिपाली गिते, योगशिक्षिका प्रज्ञा पाटील, शहर उपाध्यक्ष निलेश बोरा तसेच मंत्री महाजन यांचे विशेष अधिकारी संदीप जाधव यांच्यसह योग क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मखमलाबाद शिवारात वृक्षारोपणाद्वारे विकसित करण्यात आलेल्या वन उद्यानामध्ये हा योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात नाशिक शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, परिसरातील नागरिक, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी, तसेच कैलास मठ येथील वेधशाळेतील विद्यार्थी साधक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामूहिक योगाभ्यास केला.
——————————————


