सातपूर विभागात अतिरिक्त आयुक्तांकडून घनकचरा व्यवस्थापनाची तपासणी.

*सातपूर विभागात अतिरिक्त आयुक्तांकडून घनकचरा व्यवस्थापनाची तपासणी*
*नाशिक :जन्मत महानगरपालिकेच्या सातपूर विभागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर आणि घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोद यांनी सातपूर विभागात भेट देऊन विविध ठिकाणी पाहणी केली.
सकाळी सुमारे १०.३० वाजता अशोकनगर, सातपूर हाउसिंग परिसरातून या पाहणी दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभाग क्रमांक १० आणि ११ मधील विविध भागांना भेट देऊन स्वच्छता व्यवस्था, कचरा वर्गीकरण आणि घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
या पाहणीदरम्यान पायलट वॉर्डमध्ये घराघरातून होणाऱ्या कचरा वर्गीकरणाची तपासणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी परिसरातील महिला व कुटुंबीयांशी संवाद साधत कचरा ओला-सुका वेगळा करून देण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच नागरिकांनी स्वच्छतेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
याशिवाय ट्रान्सफर स्टेशनची पाहणी करून कचरा संकलन, हाताळणी आणि वाहतूक व्यवस्था यांची माहिती घेण्यात आली. परिसरातील स्वच्छतेची स्थिती, स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि कामकाजाची पद्धत यांचाही आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी, ट्रान्सफर स्टेशनची कार्यपद्धती तसेच उद्यानांची स्वच्छता यांचीही तपासणी करण्यात आली.
यावेळी एका मोकळ्या भूखंडावर बांधकाम साहित्य व उर्वरित बांधकामाचा मलबा टाकण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आले. याची दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अशा प्रकारे मलबा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ तो परिसर स्वच्छ करण्यास सांगावे व पुन्हा अशा प्रकारे मलबा टाकू नये, अशा सूचना देण्याचे निर्देश दिले. तसेच भविष्यात पुन्हा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक महानगरपालिकेचा स्वच्छ, सुबक आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा संकल्प पक्का असून, नागरिकांच्या सक्रिय सहभागातून कचरा वर्गीकरणाची सवय रुजविण्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.


