भऊर फाट्यावर भरधाव आयशरची स्कुटीला धडक; वरवंडी गावावर शोककळा – देवळा-कळवण रस्त्यावर भीषण अपघातः सासू-सून जागीच मृत, २ मुले गंभीर जखमी
भऊर फाट्यावर भरधाव आयशरची स्कुटीला धडक; वरवंडी गावावर शोककळा –
देवळा-कळवण रस्त्यावर भीषण अपघातः सासू-सून जागीच मृत, २ मुले गंभीर जखमी
नाशिक जन्मत प्रतिनिधी.
नासिक जिल्ह्यामध्ये अपघाताचे सत्र चालू असून दररोज कुठे ना कुठे अपघाताच्या बातम्या येत आहे. काल संध्याकाळी देवळा कळवण रस्त्यावर भीषण अपघात झाला असून सासु सुनेचा जागीच मृत्यू झालेला आहे दोन मुले गंभीर जखमी आहे या घटनेमुळे वरवंडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की
देवळा-कळवण रस्त्यावरील भऊर फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आयशर आणि दुचाकी (स्कुटी) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील वरवंडी (ता. देवळा) येथील माजी उपसरपंच अनिता विलास शिंदे (५०) आणि त्यांची सून चेतना अविनाश शिंदे (२८) या दोन महिला जागीच मरण पावल्या. त्यांच्यासोबत असलेली गुरू अविनाश शिंदे (३) आणि विधी अविनाश शिंदे (६) ही दोन लहान मुले वाचली, परंतु ती गंभीर जखमी झाली आहेत.
सासु सुना या दोघी दोन लहान मुलांसह मटाणे शिवारातील शेतातून स्कुटीवरून घराकडे जात
होत्या. त्याचवेळी कळवणहून देवळ्याच्या दिशेने भरधाव येणाऱ्या आयशरच्या मागील चाकाखाली त्या सापडल्या. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. जखमी मुलांना पुढील उपचारासाठी कळवण आणि सटाणा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. आयशरचा चालक फरार झाला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
रात्री उशिरा देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दोन्हीही महिलांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा वरवंडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्य आणि नातेवाइकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. अनिता शिंदे यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे, तर चेतना शिंदे यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. विकास सोसायटीचे माजी चेअरमन आणि उबाठा गटाचे उपतालुका संघटक विलास शिंदे यांच्या अनिता या पत्नी आणि
चेतना या सून होत्या. आयशर चालक फरार झाला असून पोलीस शोध घेत आहे.