मूत्रपिंड प्रत्यारोपण- अवयवदानात मविप्रचे डॉ. वसंतराव पवार रुग्णालय आघाडीवर*

*मूत्रपिंड प्रत्यारोपण- अवयवदानात मविप्रचे डॉ. वसंतराव पवार रुग्णालय आघाडीवर*
—————————-
*सहा महिन्यांत सहा मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी*
—————————
नाशिक :जन्मत येथील मविप्र समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि अवयवदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदविण्यात आली असून, गेल्या सहा महिन्यांत एकूण सहा मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत संस्थेत रक्ताच्या नात्यातील दात्यांकडून तीन यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपणे तसेच मेंदूमृत दात्यांकडून तीन मूत्रपिंड प्रत्यारोपणे करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या सर्व शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून करण्यात आल्या आहेत.
रक्ताच्या नात्यातील दात्यांकडून करण्यात आलेल्या तीन प्रत्यारोपणांमध्ये १४ जानेवारी २०२६ रोजी संपत मोंढे यांच्यावर वडिलांकडून मुलाला, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रोशन बच्छाव यांच्यावर आईकडून मुलाला आणि २२ जुलै २०२६ रोजी सूरज म्हसकर यांच्यावर आजीकडून नातवाला मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले.
मविप्र रुग्णालयात आजपर्यंत तीन मेंदूमृत दात्यांकडून मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले आहेत. यापैकी दोन रुग्णांना संस्थेतील मेंदूमृत दात्यांकडून मूत्रपिंड उपलब्ध झाले, तर एका रुग्णासाठी पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमधून मूत्रपिंड उपलब्ध करण्यात आले.
१७ जुलै २०२६ रोजी एका पुरुष रुग्णावर विठाबाई सोनवणे यांच्या दान केलेल्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले. २९ ऑगस्ट २०२६ रोजी रुपाली जाधव यांच्यावर पुणे येथील मेंदुमृत दात्याकडून उपलब्ध झालेले मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आले. त्यानंतर ९ सप्टेंबर २०२६ रोजी एका पुरुष रुग्णावर संस्थेतील मेंदूमृत दाते तेजस गायकवाड यांच्या दान केलेल्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपणासोबतच अवयवदानाबाबत जनजागृती आणि मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन यामुळे संस्थेच्या अवयवदान उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी आणि संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे आणि अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया प्रक्रिया पार पडल्या. या मोहिमेत अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकीबे, नाशिक शहर पोलीस, आडगाव पोलीस ठाणे, एअरपोर्ट अधिकारी, जिल्हा रुग्णालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते आणि ‘एमपीजीएमईआर’चे न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय बुक्तार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

*चोवीस तास लढा*
सर्जरी विभागप्रमुख डॉ. कैलास मोगल, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. जितेंद्र कोडीलकर, भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. अलका कोशिरे यांच्यासह डॉ. विपुल गट्टानी, डॉ. रोहन रघुवंशी, डॉ. अभिजीत मोरे, डॉ. पार्थ देवगावकर, डॉ. पुष्पेन्द्र कुमार सहाणे, डॉ. नितीन ठाकरे, डॉ. निलेश पुरकर, डॉ. हेमंत पवार, डॉ. सरिता फुलकर, डॉ. अभिनव गाडे, डॉ. गौरी दिवाण सहाय्यक नर्सिंग स्टाफ व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने २४ तास सलग परिश्रम घेऊन ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
——————————-
*अवयवदानाने अनेकांना जीवनदान*
रुग्णालयात मेंदूमृत घोषित करण्यात आलेल्या ४ रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानास संमती दिली. या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदानाची संधी मिळाली आहे. अवयवदान करणाऱ्या दात्यांमध्ये विकास महाले यांच्या मूत्रपिंडांसह यकृत, नेत्रपटल व त्वचा; संजय मंडलिक यांच्या मूत्रपिंडांसह यकृत, नेत्रपटल व त्वचा; तर तेजस गायकवाड यांच्या हृदयासह दोन मूत्रपिंड, यकृत, नेत्रपटल व त्वचेचे दान करण्यात आले. तसेच, विठाबाई सोनवणे यांच्या एका मूत्रपिंडाचे दान करण्यात आले.

गेल्या सहा महिन्यांत सहा मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होणे, ही मविप्र समाजासाठी अभिमानाची बाब आहे. मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाईकांनी दुःखाच्या प्रसंगी घेतलेला अवयवदानाचा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे अनेक रुग्णांना जीवनाची नवी आशा मिळाली आहे.अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळत असून, अवयवदानाबाबत जनजागृती वाढविण्यासाठी मविप्र समाज सातत्याने प्रयत्नशील आहे. या यशात योगदान देणाऱ्या वैद्यकीय पथकासह अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार. म वि प्र संस्थेने मानले आहे.
*-



