विना हेल्मेट दुचाकी चालकांवर होणार कारवाई* *हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन* *:प्रदिप शिंदे*
*विना हेल्मेट दुचाकी चालकांवर होणार कारवाई*
*हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन*
*:प्रदिप शिंदे*
*नाशिक, दिनांक 26 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या तीन वायुवेग पथकांद्वारे नियमित वाहतुक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीत विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या दुचाकी चालकांवर मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 194 ड नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी कळविले आहे.
1 जानेवारी 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत एकूण 8 हजार 945 दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 हजार 206 वाहने दोषी आढळली आहेत. अशा वाहनांकडून आतापर्यंत रूपये 7 लाख 44 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मोटार वाहन कायद्यान्वये दोषी वाहन चालकांचा परवाना 3 महिन्यांकरिता निलंबित करण्यात आला आहे.
मोटार वाहन निरिक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक यांच्यामार्फत खाजगी कंपनी व कार्यालयांना 1 हजार 270 नोटीस प्रत्यक्ष तर ईमेलद्वारे खाजगी कंपन्यांना 550 अशा एकूण 1 हजार 820 नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच या कार्यालयांना कलम 194 ड बाबत CCTV फुटेज उपलब्ध करून देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. तरी सर्व दुचाकी वाहन चालकांनी दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिहवहन अधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे.