कृषीवार्ता

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचा शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ* *: डॉ. भारती पवार*

*प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचा शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ*
*: डॉ. भारती पवार*
*नाशिक, दिनांक 27 जुलै 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा):*
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. मात्र आता प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र ही योजना शेतकऱ्यांना यासर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. सध्या तालुका व ग्रामीण पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रांचे रूपांतर वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे. तसेच प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांच्या माध्यमातून ८.५ करोड पीएम किसान लाभार्थी यांना १४ व्या हप्त्याचे हस्तांतरण नुकतेच झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.
*प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र*
प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र ही योजना शेतकऱ्यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यासर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. सध्या देशभरातील एक लाखाहून अधिक खत विक्री केंद्रांचे रूपांतर प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात आले आहे. उर्वरित 1.8 लाख खत विक्री दुकानांचे रूपांतर यावर्षा अखेरीस किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात येणार असल्याचे ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये सांगितले.
*अशी आहेत प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांची उद्दिष्टे…*
1. शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, औषधे, खते, किटक नाशके हे एकाच ठिकाणी रास्त दरात उपलब्ध करून देणे.
2. शेतकऱ्यांना माती, बियाणे, आणि खतांच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे किंवा जेथे चाचणी सुविधा उपलब्ध आहे त्या केंद्रांशी शेतकऱ्यांना जोडून देणे.
3. शेतकऱ्यांना लागणाऱ्या अन्य सेवा विक्री पध्दतीने किंवा कस्टम हायरींग सेंटरद्वारे उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना विविध गोष्टींबाबत माहिती पुरविणे.

4. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहिती देणे.
5. खते, औषधे, किटकनाशक यांचा मागणीनुसार पुरवठा होऊन टंचाई निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घेतली जाणार आहे.
*प्रधानमंत्री किसान समृध्दी योजनेची रूपरेषा*
देश भरात जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी 2.8 लाख दुकाने आहेत. या खत विक्री दुकानांचे किसान सुविधा केंद्रांमध्ये टप्प्या-टप्प्याने रूपांतर करण्यात येणार आहे.
*किसान समृध्दी केंद्रांचे स्वरूप*
सर्व किसान समृध्दी केंद्राच्या दर्शनी भागावर दिसतील असे एकाच पद्धतीचे फ्लेक्स बोर्ड देशभर सारखेच असले पाहिजे. स्थानिक भाषेनुसार विक्रेत्याचे नाव व अन्य गोष्टी वेगळ्या स्वरूपात असू शकतील. विक्रेत्याचे नांव, पत्ता, जीएसटी नंबर ही सर्व माहिती त्या फलकावर पटकन दिसेल अशा पध्दतीने डिझाईन केलेली असावी. शेतकऱ्यांना पटकन वाचता येईल या पध्दतीने हे माहिती बोर्ड लिहिले जावेत.
*विक्रेत्यांसाठीच्या सुविधा*
1. संबंधीत खत कंपन्यांकडून विक्रेत्यांसाठी दर सहा महिन्याला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.
2. शेती क्षेत्राशी संबंधीत वेगवेगळ्या विषयातील तज्ञ, कृषी संशोधक, वैज्ञानिक यांच्याकडून विक्रेत्यांना मार्गदर्शन केले जाईल. खताचा योग्य प्रमाणात वापर कसा व्हावा, पिकाच्या वाढीमध्ये कोणते पौष्टीक घटक आवश्यक असतात, पिकावर रोग पडल्याची लक्षणे, माती परिक्षणानुसार खत वापराचे नियोजन, सेंद्रीय खतांचा वापर आणि फायदा, जैविक खतांचे फायदे, नॅनो फर्टीलाईझर याबाबतची माहिती वैज्ञानिक, संशोधक आणि तज्ञांकडून विक्रेत्यांना दिली जाईल.
3. या प्रशिक्षण कार्यक्रमाला किमान दहा-पंधरा विक्रेते उपस्थित राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात ही माहिती खत कंपन्यांकडून खत मंत्रालयाला पाठविली जाईल.
• खत विक्री, किटक नाशके, औषधे बी-बियाणे विक्री यासाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय परवानग्या त्या विक्रेत्याने मिळविणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे जीएसटी क्रमांक असणे आवश्यक आहे. त्या केंद्रातून ज्या सेवा – सुविधा पुरविल्या जातील त्यासाठीच्या आवश्यक त्या शासकीय परवानग्याही विक्रेत्याकडे असल्या पाहिजे.
• सुविधा केंद्राचा संचालक खत कंपन्या, कृषी महाविद्यालये, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या संपर्कात असला पाहिजे.
• विक्रेत्याने शेतकऱ्यांशी व अन्य संबंधीतांशी त्वरेने संपर्क साधण्यासाठी आयटी तंत्रज्ञानाचा प्राधान्याने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांचा व्हॉटस् अ‍ॅपवर किसान समृध्दी समुह या नावाने ग्रुप तयार करून त्याद्वारे शेतकऱ्यांकडे वेगवेगळी माहिती तातडीने पोहचवण्याचे काम विक्रेत्याने केले पाहिजे.
• खत उत्पादक कंपन्यांनी या सुविधा केंद्रांच्या दर्शनी भागावर शेतकऱ्यांना पटकन दिसतील अशा पध्दतीचे दोन इंडिकेटर बोर्ड लावले पाहिजेत. त्या केंद्राच्या परिसरातील शेतकऱ्‍यांच्या मातीचे नमुने गोळा करण्यासाठी आणि त्याची तपासणी करण्यासाठीची मोबाईल सॉईल टेस्टिंग व्हॅन (फिरते माती परिक्षण केंद्र) त्या विक्रेत्याने सुरू करणे अपेक्षीत आहे. जवळच्या सरकारी बियाणे परिक्षण प्रयोग शाळेतून बी-बियाणांची जलद चाचणी करून देणे ही अपेक्षीत आहे, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे