विधान परिषद पदवीधर निवडणूक; मत कसे नोंदवावे*q
*विधान परिषद पदवीधर निवडणूक; मत कसे नोंदवावे*
*नाशिक,दि.20 जानेवारी,2023(विमाका वृत्तसेवा)*
विधान परिषद नाशिक पदवीधर मतदार संघासाठी 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेवर होणार असून हे मतदान कसे नोंदवावे, याची माहिती पुढीलप्रमाणे..
➡️मत नोंदविण्यासाठी आपल्याला मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेन वापरू नका.
➡️आपण निवडलेल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढील ‘पसंतीक्रम नोंदवा’ या रकान्यात ‘१’ हा अंक लिहून मत नोंदवा.
➡️ एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून द्यायचे असले तरी ‘१’ हा क्रमांक एकाच उमेदवाराच्या नावापुढे नोंदवावा.
➡️निवडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रमांक आपणांस उपलब्ध आहेत.
➡️ उरलेल्या उमेदवारांकरिता आपल्या पसंतीक्रमानुसार पुढील पसंतीक्रमांक अनुक्रमे २, ३, ४ इ. नोंदवावेत.
➡️कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच अंक नोंदवा. एकच अंक एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे नोंदवू नका.
➡️पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत, जसे की— १, २, ३, इ. पसंतीक्रम एक, दोन, तीन, इ. असे अक्षरी नोंदवू नका.
➡️अंकांच्या आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये , जसे की— 1, 2, 3, इ. किंवा रोमन लिपीमध्ये , जसे की— I, II, III, इ. किंवा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेच्या लिपीमध्ये पसंतीक्रमांक नोंदविता येतील.
➡️मतपत्रिकेवर स्वाक्षरी करू नका, आद्याक्षरे लिहू नका, आपले नाव लिहू नका किंवा कोणताही शब्द लिहू नका. तसेच, मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नका.
➡️ तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी ‘✔️’ किंवा ‘✖️’ अशा खुणा करू नका. अशा खुणा केलेल्या मतपत्रिका अवैध होतील.
➡️ तुमची मतपत्रिका वैध ठरण्याकरिता तुमचा पहिला पसंतीक्रम कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे ‘१’ हा अंक नमूद करून नोंदविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम नोंदवणे केवळ ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही.
0000000000