आरोग्य व शिक्षण

नागरिकांनी गणेश उत्सव सतर्क राहून आनंदाने साजरा करावा. रस्त्याची दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करावी राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार.

: 29 ऑगस्ट 2022

 

*नागरिकांनी गणेशोत्सव सतर्क राहून आनंदाने साजरा करावा;*

*रस्त्यांची दुरूस्तीची कामे वेगाने पूर्ण करावीत*

*- केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार*

 

*नाशिक, दिनांक : 29 ऑगस्ट, 2022 (जिमाका वृत्तसेवा)*

नागरिकांनी येणारा गणेशोत्सव साजरा करतांना सतर्कता बाळगावी. तसेच गणरायाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी खबरदारी घेत आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात. त्याचप्रमाणे संबंधित विभागांनी रस्ते दुरूस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विविध विभागांच्या आढावा बैठकीत केंद्रीय डॉ. पवार बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रशेखर पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, सहायक जिल्हाधिकारी विकास मीना, वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिलहाधिकारी गणेश मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, महानगपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिकचे विभाग नियंत्रक अरूण सिया यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरावस्था त्यात निर्माण झालेले खड्डे यामुळे नागरिकांना खूप त्रास होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी उपलब्ध असलेल्या निधीमधून तत्काळ रस्ते दुरूस्तीची कामे मार्गी लावावीत. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यांच्या अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे दर्जेदार असावीत. यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यावर प्रशासकीय यंत्रणांनी भर द्यावा, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

 

जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे चांगल्या दर्जाची होण्यासोबतच वेळेत पूर्ण करण्यात यावीत. सोळा गाव पाणी पुरवठा योजनेतील कामे करतांना ग्रामस्थांना विश्वासात घेवून कामे करण्यावर भर द्यावा. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत जमीनींचे पंचनामे करतांना कोणीही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे. अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्तांमुळे काही ठिकाणी एस.टी. बसेस जाणे शक्य होत नाही. तेथे एस. टी. महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने एस.टी. सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत सरोवर योजनेंतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या 75 अमृत सरोवरांपैकी 47 सरोवरांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच या सरोवरांपैकी 4 ठिकाणी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आले आहे. या सरोवरांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत सरोवर योजना असे फलक लावण्यात यावेत. वन विभागामार्फत ममदापूर येथील वनांचे संवर्धन करून नैसर्गिक साधन संपत्तीच्या माध्यमातून या वनांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यात यावा. पर्यटनासाठी आवश्यक सोयी सुविधांची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही केंद्रीय त्यांनी दिल्या.

 

गणेशोत्सवाच्या काळात कोरोना तसेच साथरोग यांचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. गणपती विसर्जन मिरवणूकीत गर्दी होणार नाही तसेच कोणतीही दुर्घटना घडणार नाही यादृष्टिने प्रशासनामार्फत नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे गर्दी टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची जनजागृती देखील करण्यात यावी. तसेच साथरोगांबाबत खाजगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची देखील माहिती घ्यावी. आयुष्यमान भारत योजनेंतंर्गत कार्ड वाटपाबाबत कॅम्प घेण्यात यावेत. त्याचप्रमाणे आरोग्य संदर्भातील केंद्र सरकारच्या योजनांच्या माहितीचे फलक जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपविभागीय रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत. मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी रेफरल ऑडिटचे काम करण्यात आले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले असून याबाबत हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी,असेही त्यांनी सांगितले.

 

या बैठकीत संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांनी केलेल्या कामाची माहिती सादर केली.

0000000000000

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे