घाटमाथ्यावर पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा. शेतकरी वर्गाला पावसाची प्रतीक्षा.
घाटमाथ्यावर पोळ्याचा सन मोठ्या उत्साहात साजरा
अरुण हिंगमीरे
जातेगांव ,नांदगाव
जातेगांव नाशिक जनमत (प्रतिनिधी)– नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर बोलठाण, जातेगाव, गोंडेगाव, रोहिला, ढेकु लोढरे इत्यादी गावात शेतकरी बांधवांचा मित्र असलेल्या सर्जाराजा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातील श्रावण महिन्याच्या शेवटी येणाऱ्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी दि.२६ ऑगस्ट शुक्रवारी रोजी पोळा हा सन शेतकरी बांधवांनी उत्साहात व शांततेत साजरा केला.
सालाबादप्रमाणे या वर्षी शेतकरी बांधवांनी जातेगांव येथे आपापल्या बैलांना नदीवर नेवून साबणाने स्वच्छ धुवून काढले, त्यानंतर त्यांना नवीन वेसण, माथोटी, कासरा बांधून तसेच त्यांच्या शिंगांना व आंगावर वेगवेगळे रंग लावून छान सजावट करुन परंपरेनुसार पाच वाजेच्या दरम्यान गावाच्या उत्तरेकडे असलेल्या पुरातन वेशीच्या बाहेर नेवून नंतर गावातील बैल आल्यानंतर वेशीच्या आतुन ढोलताशांच्या गजरात बैल मारुती मंदिरात तसेच ग्रामदेवता श्री पिनाकेश्वर महादेवाच्या आणि बेरोबा देवाच्या मंदिरात श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली .
गावातील सर्व बैल एकत्र काढण्यात अडचण येवू शकते त्या अनुषंगाने पुर्वीपासून येथे गावातील बहुजन समाजातील शेतकरी बांधवांच्या बैलांचा तसेच धनगर समाज बांधव व इतर आणि माळी समाजबांधव व त्यांच्या परिसरात असलेल्या शेतकरी बांधवांच्या बैलांचा असे स्वतंत्र तीन वेगवेगळ्या पोळ्याच्या निमित्ताने बैलांच्या मिरवणुकी काढण्यात आल्या.
याप्रसंगी सुवासिनींनी वर्षभर विविध कामासाठी साथ देणार्या सर्जाराजाचे औक्षण करून त्यास पुरणपोळीचा नैवेद्य व वेगवेगळे धान्य खाऊ घातले.
ग्रामपंचायतचे उपसरपंच पंढरीनाथ वर्पे सदस्य रामदास पाटील, बाळु लाठे, विजय पाटील, बाळु पवार, राजु शूख, सोमेश्वर खिरडकर, अनिल पवार, आप्पा पवार, नामदेव वर्पे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोळ्याच्या मिरवणुकीचे नेतृत्व केले होते.