ब्रेकिंग

मविप्रची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे*

म वि प्र संस्था मागील चार वर्षात प्रगतीपथावर१,२२९ कोटींचे विक्रमी अंदाजपत्रक ; ६०० हून अधिक सामंजस्य करार, ७,६१४ विद्यार्थ्यांना रोजगार.

*मविप्रची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे*

*१,२२९ कोटींचे विक्रमी अंदाजपत्रक ; ६०० हून अधिक सामंजस्य करार, ७,६१४ विद्यार्थ्यांना रोजगार*

———————————-

*नाशिक :* जनमत    ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन गेल्या ११२ वर्षांपासून जिल्ह्यातील अठरापगड जातीतील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाज अर्थात, ‘मविप्र’ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २० रोजी दुपारी १:०० वाजता मराठा हायस्कूलच्या कै. तुकारामजी रौंदळ सभागृहात संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने संस्थेने प्रकाशित केलेला ११२ वा वार्षिक अहवाल व मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त संस्थेच्या सर्व १० हजार ६६० सभासदांपर्यंत घरपोच दिले आहेत. तसेच त्यासोबत संस्थेचे मुखपत्र असलेल्या मविप्र पत्रिकेचा ‘रोजगार विशेषांक’देखील प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचविण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवार दि. १८ रोजी आयोजित पत्रकार परिषदेस संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. संदीप गुळवे, ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे आदींसह सर्व शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

*सभेपुढील विषय*

१) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे

२) मविप्र समाजाचा सन २०२५- २०२६ चा वार्षिक अहवाल वाचून मंजूर करणे

३) सन २०२५- २०२६ चे मविप्र समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे व सर्व शाखांचे विभागवार एकत्रित खर्च-उत्पन्न पत्रके व ताळेबंद पत्रके यांना मंजुरी देणे

४) सन २०२६ – २०२७ साठी मविप्र समाजाचे मध्यवर्ती कार्यालय व सर्व शाखांच्या एकत्रित अंदाजपत्रकास मंजुरी देणे

५) सन २०२६-२०२७ साठी हिशोब तपासणीसांची नेमणूक करणे

६) संस्थेच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडी-अडचणींचा विचार करणे तसेच मविप्र समाजाच्या विकासासाठी आर्थिक बाबींचा विचार करणे

७) मविप्र समाजाच्या ध्येयधोरणांनुसार पुढील कार्याची दिशा ठरविणे

८) संस्थेच्या मालकीचा स.नं.६९० ‘अ’ व ‘ब’मधील फायर ब्रिगेड स्टेशनकरिता आरक्षित असलेले ८ हजार चौ.मी. क्षेत्र मनपास हस्तांतर करणेस आलेल्या पत्राबाबत निर्णय घेणे

९) मा. अध्यक्षसाहेब यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.

या अनुषंगाने संस्थेच्या सभासदांना दि. १०/०९/२०२६ ते १७/०९/२०२६ या कालावधीत संस्थेचा हिशोब व इतर कागदपत्रे पाहण्याची व्यवस्था मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आली होती, असेही यावेळी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.

*सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ठळक बाबी*

१. *२ लाख १२ हजार ८१६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत :* संस्थेचे १० हजार १९७ जनरल सभासद व ४६३ आजीव सेवक सभासद असे एकूण १० हजार ६६० सभासद आहेत. संस्थेच्या सर्व ५१४ ज्ञानशाखांमध्ये २ लाख १२ हजार ८१६ विद्यार्थी यशस्वीपणे शिक्षण घेत असून, ११ हजार ५६५ सेवक उत्तम सेवा देत आहेत.

 

२. *१,२२९ कोटी ३० लाख रुपयांचे विक्रमी अंदाजपत्रक :* ३१ मार्च २०२५ रोजी संस्थेच्या सर्व शाखांचे व मध्यवर्ती कार्यालयाचे कर्ज १९ कोटी १९ लाख रुपये इतके बाकी होते. अहवाल काळात संस्थेने १ कोटी ४८ लाख रुपये इतक्या कर्जाची परतफेड केलेली असून, दिनांक ३१.०३.२०२६ पर्यंत संस्थेवर १७ कोटी ७१ लाख रुपये कर्ज बाकी आहे. तसेच, संस्थेने २०२२ ते मार्च २०२६ पर्यंत १५६ कोटी रुपयांची थकित बिले अदा केली असून, ४७ कोटी ९८ लाख १४ हजार रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. २०२६-२७ साठी संस्थेचे सुमारे १,२२९ कोटी ३० लाख रुपयांचे अंदाजपत्रक आहे. संस्थेचे हे आजवरचे सर्वांत विक्रमी अंदाजपत्रक ठरले आहे.

३. *मविप्र रुग्णालयात ८ लाख ७९ हजार ९०५ तपासण्या व शस्त्रक्रिया :* मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये अहवाल काळात ४ लाख ५९ हजार ३४० रुग्णनोंदणी झाली. तर याच रुग्णांच्या ८ लाख ७९ हजार ९०५ विविध प्रकारच्या तपासण्या-चाचण्या व शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामध्ये विविध शिबिरांतर्गत ७४ हजार ६८३ रुग्णांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. रक्तदान शिबिरांमध्ये ३ हजार ७६ दात्यांनी रक्तदान केले असून, एकूण ४४ व्यक्तींनी देहदान केले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना विश्रांती घेता यावी, यासाठी रुग्णालय आवारात ‘सहारा कक्ष’ स्थापन करण्यात आला असून, हजारो नातेवाईकांनी याचा लाभ घेतला आहे.

 

४. *भारतासह जपान व डेन्मार्क येथे ७,२३४ उमेदवारांना नोकरीची संधी :* कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मविप्र संस्थेत कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरच्या वतीने आणि सीआयआयच्या सहकार्याने संस्थेच्या विविध शाखांमध्ये आजवर एकूण १४ महानोकरी मेळावे घेण्यात आले आहेत. या मेळाव्यांसाठी भारतासह परदेशातील विविध क्षेत्रांतील १०० हून अधिक कंपन्या व बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये १३ हजार ३५० उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी तब्बल ७,६१४ विद्यार्थ्यांना नाशिकसह देशभरातील विविध कंपन्या तसेच, जपान व डेन्मार्क येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी देण्यात आली आहे.

 

५. *६०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार :* नवीन शैक्षणिक धोरण आणि आधुनिक युगातील स्पर्धा यात विद्यार्थी गुणवत्तेत टिकून राहावा, यासाठी गेल्या चार वर्षांत गुणवत्तापूर्वक बदल करण्यात आले. यात विद्यार्थी व शिक्षकांचा कौशल्यविकास, रोजगारवृद्धी व संस्थात्मक सर्वांगीण विकास असे धोरण ठरविण्यात आले. देशभरातील ६०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या आणि संस्थासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. कौशल्यवाढीसाठी वेगवेगळे ३४६ प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु आहेत. वर्षभरात २ हजार २८१ रिसर्च पेपर आणि चाप्टर इन बुक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच, विद्यार्थी व शिक्षकांकडून १६९ पेटंटची नोंदणी झाली आहे. यावर्षी एचआरडीसीमार्फत आयोजित नऊ कार्यशाळांतून १,१३३ शिक्षक, प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांनी सहभाग घेतला. बीएएसएफतर्फे आयोजित किड्स लॅब प्रशिक्षणात २१ विद्यार्थ्यांना एकत्रित १ लाख ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. मविप्र माजी विद्यार्थी संघाने ‘शाळा तिथे प्रयोगशाळा’ या संकल्पाअंतर्गत यावर्षी ३५ शाळांमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करून दिल्या आहेत. जनशिक्षण संस्थानतर्फे यावर्षी ९२ प्रशिक्षण वर्गांमध्ये सहभाग घेऊन १८९० प्रशिक्षणार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.

 

६. *वर्षभरात मिळाले १२ पुरस्कार :* यावर्षी संस्थेच्या प्रांगणात चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून संस्थेला पाच लाख रुपये, सन्मानपत्र असे स्वरूप असलेला ‘मराठी भाषा सेवेकरी’ पुरस्कार मिळाला. अखिल भारतीय अभियांत्रिकी परिषदेतर्फे सर्वोत्कृष्ट तांत्रिक शिक्षण देणारी संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला अखिल भारतीय अभियांत्रिकी परिषदेचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय पुरस्कार’, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकलादेखील आयईटीईचा ‘सर्वोत्कृष्ट आयएसएफ सेंटर पुरस्कार’ मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे केटीएचएम महाविद्यालयाला ‘डॉ. वसंतराव निवृत्ती पवार चषक’ मिळाला. असे यावर्षी एकूण १२ पुरस्कार संस्थेसह विविध शाखांना मिळाले आहेत.

७. *गुणवत्ताप्राप्त ५१७ विद्यार्थी, २९६ शिक्षक :* संस्थेच्या विविध शाखांमधील २२४ खेळाडूंनी राज्यस्तरीय, ११५ खेळाडूंनी राष्ट्रीय, तर ०६ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय प्राविण्यप्राप्त केले आहे. तसेच ९६ विद्यार्थी नेट-सेट, गेट, सीए परीक्षा उत्तीर्ण झाले असून, ७६ विद्यार्थ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी व विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. ६२ शिक्षकांनी पेटंट, तर ५० शिक्षकांनी दीर्घ-लघु संशोधन प्रकल्प प्राप्त केले असून, ५१ शिक्षकांनी पीएचडी पूर्ण केली आहे. ५९ शिक्षक नेट-सेट, गेट, सीए परीक्षा उत्तीर्ण झाले असून, १३७ शिक्षकांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी व विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत.

 

८. *संस्थेतील नावीन्यपूर्ण ५६ उपक्रम :* संस्थेच्या आधीच्या यशस्वी उपक्रमांबरोबरच यावर्षी बॉश ट्रेनिंग सेंटर अंतर्गत संगणक प्रशिक्षण केंद्र, टेक्निकल स्किल ट्रेनिंग सेंटर, आयसर, ब्रिटीश कौन्सिल, महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट ऑथेरिटी आदी संस्थांमार्फत शिक्षकांसाठी प्रशिक्षण, कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेंटर, कर्मवीर कबड्डी चषक स्पर्धा, मविप्र दिनदर्शिका, मविप्र फिटनेस अकॅडमी, मविप्र व्यावसायिक केंद्रे, मविप्र क्रीडा महोत्सव, युवा स्पंदन, सांस्कृतिक महोत्सव, जेनेरीक मेडिकल स्टोअर, क्वालिटी अश्युरंस सेल, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, राष्ट्रीय खेळाडूंना संस्थेच्या शाखांमध्ये विनामूल्य प्रवेश, अंध विद्यार्थ्यांना एक रुपयात प्रवेश, आयुष्मान भारत योजनेतून गुडघा व खुबा रोपण, ‘शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्री केंद्र’ असे एकूण ५६ उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत.

 

९. *विद्यार्थ्यांनी गरजूंपर्यंत पोहोचविले ७५ पोती धान्य :* वडनेरभैरव महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून दर शनिवारी ‘पसाभर धान्य’ उपक्रमांतर्गत ४० पोती धान्य गोळा करून आधारतीर्थ आश्रमाला दिले. तर इगतपुरी येथील कर्मयोगी पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘पसाभर धान्य’ उपक्रमांतर्गत ३५ पोती धान्य गोळा करून गरजूंपर्यंत पोहोचविले. असेच उपक्रम इतरही शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.

 

१०. *अहवाल काळात ४ नवीन शाखा सुरु :* राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, संशोधनाला गती, शिक्षकांचे प्रशिक्षण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राची सांगड, तंत्रज्ञान, रोजगार संधी आणि कौशल्यांचा शोध या उद्देशांच्या पूर्तीसाठी या वर्षात संस्थेने चार नवीन शाखा सुरू केल्या आहेत. त्यात एक कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेंटर, आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, होरायझन आयसीएसई ज्युनियर कॉलेज या शाखांचा समावेश आहे.

 

११. *मविप्रच्या भावी योजना :* संस्थेच्या वतीने पुढील काळात मविप्र दंत वैद्यक महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय, पशुवैद्यक महाविद्यालय, हॉर्टिकल्चर महाविद्यालय, मविप्र स्पोर्ट्स अकॅडमी, मविप्र ड्रोन सेंटर, मिल्ट्री प्रिपेटरी स्कूल, बी.व्होक. ॲव्हिएशन, टिशू कल्चर लॅब, मविप्र संगीत अकादमी, बी.एस्सी. एआयडीएस, मविप्र आयटीआय-पाचोरेवणी सुरू करण्याचा मानस आहे.

—————————————————-

*नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. संदीप गुळवे, ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे आदींसह सर्व शिक्षणाधिकारी.*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे