जूनपासून ११,६०९, तर अवघ्या चार दिवसांत २,५६८ खड्ड्यांची दुरुस्ती मुसळधार पावसाच्या आव्हानातही महापालिकेची युद्धपातळीवर मोहीम; मिलिंग मटेरियलसह विविध तंत्रांचा वापर
नाशिक जनमत जूनपासून ११,६०९, तर अवघ्या चार दिवसांत २,५६८ खड्ड्यांची दुरुस्ती
मुसळधार पावसाच्या आव्हानातही महापालिकेची युद्धपातळीवर मोहीम; मिलिंग मटेरियलसह विविध तंत्रांचा वापर
नाशिक : पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले असले, तरी नागरिकांना त्याचा कमीत कमी त्रास व्हावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने रस्ते दुरुस्तीची मोहीम अधिक वेगाने सुरू ठेवली आहे. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकांनी शहरभर युद्धपातळीवर काम करत जून महिन्यापासून आतापर्यंत तब्बल ११,६०९ खड्डे बुजविले असून, त्यानंतर केवळ ३० जुलै ते २ ऑगस्ट या चार दिवसांत आणखी २,५६८ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व सहा विभागांमध्ये दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात आली आहे. मुख्य रस्ते, वाहतुकीची जास्त वर्दळ असलेले मार्ग आणि नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींना प्राधान्य देत विभागनिहाय पथके सातत्याने कार्यरत आहेत.
पावसामुळे प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या स्थितीनुसार जीएसबी, मुरूम, कोल्डमिक्स तसेच नव्याने उपलब्ध झालेल्या मिलिंग मटेरियलचा वापर केला जात आहे. विशेषतः मिलिंग मटेरियलच्या वापरामुळे पावसाळ्यातील खड्डे दुरुस्ती अधिक परिणामकारक होण्याची अपेक्षा असून, त्याचा वापर शहरातील विविध भागांत सुरू करण्यात आला आहे.
कालावधी : १ जून ते २९ जुलै
विभाग
दुरुस्त केलेले खड्डे
पंचवटी
५,४८४
नाशिक रोड
२,०४९
सातपूर
१,८२०
पश्चिम
८९८
नवीन नाशिक
८५०
नाशिक पूर्व
५०८
एकूण
११,६०९
कालावधी : ३० जुलै ते २ ऑगस्ट (४ दिवस)
विभाग
दुरुस्त केलेले खड्डे
सातपूर
८६९
पंचवटी
४९६
पश्चिम
३५४
नवीन नाशिक
३१४
नाशिक रोड
३१२
नाशिक पूर्व
२२३
एकूण
२,५६८
दरम्यान, पावसाचा जोर कायम असतानाही रस्ते दुरुस्तीची कामे अखंड सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिले जात असून, हवामानानुसार आवश्यक त्या तांत्रिक उपाययोजनांचा वापर करून रस्ते सुरक्षित करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
