कुंभमेळा तयारी.आडगावला अत्याधुनिक ट्रक टर्मिनस उभारणार
आडगावला अत्याधुनिक ट्रक टर्मिनस उभारणार
नाशिक : जनमत आगामी सिंहस्थ कुंभमेळा, वाढती मालवाहतूक आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आडगाव येथे अत्याधुनिक ट्रक टर्मिनस उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत प्रस्तावित असलेला हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार असून, मालवाहतूक क्षेत्रासाठी तो महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
सुमारे २८ एकर क्षेत्रावर हा प्रकल्प विकसित होणार आहे. प्रकल्पामध्ये अंदाजे ६० टक्के क्षेत्र ट्रक टर्मिनससाठी तर ४० टक्के क्षेत्र वे-साईड अँमेनीटीज (प्रवासी व वाहनचालक सुविधा) यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. प्रकल्पाचे स्थान राष्ट्रीय महामार्ग, बस डेपो आणि प्रमुख वाहतूक मार्गांशी जोडलेले असल्याने मालवाहतुकीच्या दृष्टीने ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
प्रकल्पांतर्गत किमान ३०० ट्रक पार्किंग बेची व्यवस्था करण्यात येणार असून, ट्रक चालकांसाठी व मालवाहतूक क्षेत्रासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये माल साठवण व लोडिंग-अनलोडिंग सुविधा, वाहन दुरुस्ती कार्यशाळा, चालकांसाठी निवास व्यवस्था (डॉर्मिटरी), तसेच ट्रान्स्पोर्ट लॉजिस्टिक्ससाठी पूरक सुविधा विकसित करण्याची तरतूद आहे.
टर्मिनस परिसरात ट्रक चालक, प्रवासी आणि वाहतूक क्षेत्राशी संबंधित घटकांसाठी विविध अत्यावश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामध्ये स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फूड कोर्ट, ढाबे, किरकोळ विक्री केंद्रे, प्राथमिक उपचार केंद्र, एटीएम, वाहन दुरुस्ती सेवा, इंधन केंद्र, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, पर्यटक माहिती केंद्र, अल्पकालीन मुक्कामासाठी खोल्या, सेल्फ-लाँड्री सुविधा आणि ओपन जिम यांचा समावेश असणार आहे.
प्रकल्पामध्ये पर्यावरणीय बाबींनाही प्राधान्य देण्यात आले आहे. किमान १५ टक्के क्षेत्र हरित पट्टा म्हणून विकसित करण्यात येणार असून, अग्निसुरक्षा, पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा मानकांचे पालन बंधनकारक राहणार आहे. तसेच पाणीपुरवठा, वीज, मलनिस्सारण आणि दूरसंचार यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याशिवाय वजन काटा, ट्रक सर्व्हिस सेंटर, शो-रूम, ट्रान्सपोर्ट कार्यालये, मोटेल किंवा हॉटेल यांसारख्या अतिरिक्त सुविधांचाही विकास करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ ट्रक पार्किंगपुरता मर्यादित न राहता लॉजिस्टिक्स व ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील अव्यवस्थित ट्रक पार्किंगला पर्याय उपलब्ध होणार असून, महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. त्याचबरोबर मालवाहतूक क्षेत्राला आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने नाशिकच्या औद्योगिक आणि व्यापारी विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षादेखील महापालिकेकडून व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्दे :
घटक
माहिती
एकूण क्षेत्रफळ
सुमारे २८ एकर
ट्रक टर्मिनस क्षेत्र
६० टक्के
वे-साइड सुविधा क्षेत्र
४० टक्के
ट्रक पार्किंग क्षमता
किमान ३०० ट्रक
स्थान
आडगाव, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत
प्रमुख सुविधा :
– डॉर्मिटरी व चालक विश्रांतीगृह
– ढाबा, फूड कोर्ट
– पिण्याचे पाणी.व स्वच्छतागृहे वैद्यकीय मदत केंद्र. वाहन दुरुस्ती सुविधा इंधन व ई-चार्जिंग स्टेशन- माल साठवण व लोडिंग-अनलोडिंग सुविधा
– एटीएम, किरकोळ विक्री केंद्रे
आडगाव ट्रक टर्मिनस हा केवळ पार्किंग प्रकल्प नसून नाशिकच्या भविष्यातील वाहतूक आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेचा महत्त्वाचा पाया आहे. ट्रक चालकांसाठी सुसज्ज सुविधा, मालवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था आणि राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडणी यामुळे हा प्रकल्प प्रदेशाच्या आर्थिक गतिमानतेला नवी दिशा देईल. सिंहस्थपूर्व तयारीचा भाग म्हणून शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



