
नाशिक जन्मत विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर त्या बिबट्याने जमा झालेल्या नागरिकांच्या समूहावर जोरदार हल्ला केला. यात एका तरुणाने जखमी होत बिबट्याशी झुंज दिली. व त्याला पकडून ठेवले. जखमी तरुण उपचार घेत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील शहापूर (ता. जामनेर)
गावाच्या शेतशिवारातील एका विहिरीत बिबट्या पडला. तेथून बाहेर पडताच बिबट्याने तेथील जमावातील एकावर हल्ला केला. तरुणाने देखील काही मिनिटे बिबट्याशी झुंज देत त्याला तसेच दाबून धरले. हा थरार सुरू असतानाच तेथील ग्रामस्थांनी समयसूचकता दाखवत बिबट्याला जाळीने दाबून ठेवत तरुणाची सुटका करीत बिबट्याला वन विभाग पथकाच्या ताब्यात दिले. मुकेश नाना
डोंगरे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेत तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जामनेर तालुक्यातील शहापूर-टाकरखेडा रोडवरील शेतात
बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यावर तरुण मुकेश नाना डोंगरे हा शेतात गेला. त्यावेळी तेथे अनेक ग्रामस्थही जमले होते. वन विभागाला संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. काही वेळाने वन विभागाचे पथक तेथे पोहचले. तेवढ्या वेळात बिबट्या शेतातील विहिरीत उतरला. त्याला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांसह वन विभागाचे लोक काम करीत असतानाच बिबट्या विहिरीतून वर येताच त्याने मुकेश डोंगरे या तरुणावर हल्ला केला. अचानक हल्ला झाल्यानंतरदेखील मुकेश डोंगरे यांनी धाडस दाखवत बिबट्याच्या हल्ल्याचा प्रतिकार केला. बिबट्याच्या जबड्यात हात असल्याने तो तसाच पुढे नेत झुंज देत त्यांनी त्याला खाली दाबून ठेवले.
ग्रामस्थ व वन विभागाच्या पथकाने बिबट्यापासून तरुणाची सुटका केली. त्यानंतर दोरी व जाळीने बिबट्याचे पाय बांधून अधिकारी त्याला पिकअपमधून घेऊन गेले.

वन विभागाचे पथक उशिरा आल्याने नागरिकांमध्ये नाराजी

बिबट्याची माहिती देऊनदेखील वन विभागाचे पथक उशिरा आले. बिबट्याला पकडण्यासाठी मदत करणाऱ्यांना लाठीमार केल्याचा आरोप ग्रामस्थांसह जखमी मुकेश डोंगरे यांनी केला. तर विहिरीत बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच पथक पोहचले. पिंजरा कार्यालयात असल्याने आणण्यास विलंब झाला. मात्र, पथकाने मारहाण केली नसल्याची माहिती वन विभागाने दिली.


