शेतकरी व पाणीवापर संस्थांनी पाणी लाभासाठी* *25 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत *- सागर शिंदे*
*शेतकरी व पाणीवापर संस्थांनी पाणी लाभासाठी*
*25 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत
*- सागर शिंदे*
*नाशिक: दिनांक 07 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक डावा तट कालवा, गोदावरी उजवा व डावा तट कालवा, आळंदी डावा व उजवा तट कालवा, पालखेड उजवा तट कालवा इत्यादी लाभक्षेत्र तसेच वालदेवी, मुकणे, भावली, दारणा, वाकी, भाम, गंगापूर, कडवा, गौतमी-गोदावरी, काश्यपी व आळंदी या धरणांचे जलाशय तसेच कडवा, दारणा, गोदावरी नदीचा भाग आणि गोदावरी नदीवरील या विभागाच्या
अधिपत्याखाली एकूण 09 कोल्हापूर बंधारे यांचा समावेश आहे. या ठिकाणाहून प्रवाही व उपसा सिंचनाने पाणी घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी व पाणी वापर संस्थांनी पाण्याचा लाभ घेण्यासाठी 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी केले आहे.
शासनाच्या धोरणानुसार धरणातील उपलब्ध पाणी हे उन्हाळा हंगामाअखेर पुरवावे
लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्यात शेतीच्या पिकासाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरवठा करण्याचे नियोजन आहे. वर नमूद धरणातील पाणी हे लाभक्षेत्रातील बारामाही उभ्या पिकांना रब्बी हंगामा अखेर पाणी पुरवठा सुलभ होण्यासाठी मंजूरी क्षेत्रात उभ्या पिकांना पाणी घेतांना शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी घ्यावे तथा सूक्ष्म सिंचनावर भर देण्यात यावा. पाणी पुरवठ्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीची जबाबदारी व्यक्तीश: शेतकऱ्याची असून त्याबाबत शासनाकडून कोणतीही भरपाई देय राहणार नाही.
ज्या कालव्यांवर अथवा चारीवर नमूना नंबर 7 च्या प्रवर्गातील मागणी उपलब्धतेपेक्षा जास्त असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात शाखा, उपविभाग स्तरावर सम प्रमाणात कपात करून विहित अटी व शर्तीनुसार मंजूरी देण्यात येणार आहे, असेही कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी कळविले आहे.