एकाच दिवसात दोन ठिकाणी आडगाव परिसरात दोन बिबटे मृत्युमुखी.
विष प्रयोगाची शक्यता. वन विभाग म्हणतोय नैसर्गिक मृत्यू

नाशिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे दिसू लागलेले आहेत. दरम्यान बिबट्यांची दहशत वाढलेली आहे. काल आडगाव परिसरात मोकळ्या भूखंडांवर सलग दोन ठिकाणी दोन नर बिबट्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांच्या मृत्यूचे कारण समजले नसून दोन्ही मृतदेह म्हसरुळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात नेण्यात आले असल्याची माहिती सहायक वनरक्षकांनी दिली.
संग्रहित फोटो
आडगाव येथील ज्ञानेश्वर संतोष शिंदे यांच्या जमिनीत सात वर्षाचा नर बिबट्याचा, तर काही अंतरावरील मंगेश उत्तम लभडे यांच्या मालकीच्या जागेतही सहा वर्षांच्या नर बिबट्याचा मृतदेह बुधवारी दुपारी आढळून आला. दोन्ही ठिकाणी वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला. मृतदेहांवर बिबट्यांना जखमा नसल्याचे, तसेच अवयव चोरी झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने नैसर्गिक
मृत्यूचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. शवविच्छेदन करण्यात येऊन पशुधन विकास अधिकारी यांनी नमुने संकलित केले आहेत. ते पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून त्यातूनच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. नंतर दोन्ही मृतदेहांचे दहनसंस्कार झाले. अधिक तपास वनाधिकारी करत आहे.