अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
दिनांक: 17 ऑक्टोबर, 2022
*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत*
*- प्रकल्प अधिकारी*
*नाशिकःजनमत दिनांक 17 ऑक्टोबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा):*
आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती व इतर योजना राबविण्यात येते. 2022-23 शैक्षणिक वर्षात या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रशांत साळवे यांनी केले आहे.
नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड, येवला, दिंडोरी, इगतपुरी, पेठ तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित तसेच कायम विना अनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षातील नवीन व नुतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन सादर करणे अपेक्षित आहे. त्यासाठी 21 सप्टेंबर, 2022 पासून https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्यासाठी महाविद्यालयाने सूचना फलकावर सूचना लावून विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करावे. भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनांच्या लाभापासून अनुसूचित जमातीचे विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असेही श्री साळवे यांनी सांगितले.