साखर कारखान्यांनी गाळप हंगामा साठी उपलब्ध उसाचे नियोजन करावे. मिलिंद भालेराव
*साखर कारखान्यांनी गाळप हंगामासाठी*
*उपलब्ध ऊसाचे नियोजन करावे*
*:मिलिंद भालेराव*
*नाशिक दिनांक 24 मार्च 2022नाशिक जनमत: साखर आयुक्तालयाने दिलेल्या सूचनांनुसार अहमदनगर प्रादेशिक विभागातील (अहमदनगर व नाशिक जिल्हा) सहकारी व खाजगी साखर कारखन्यांनी 2021-22 गाळप हंगामासाठी उपलब्ध असलेल्या ऊसाचे संपूर्णपणे गाळप होईल यादृष्टीने नियोजन करावे असे प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर मिलिंद भालेराव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, अहमदनगर प्रादेशिक विभागातील सर्व सहकारी व खाजगी कारखान्याकडे ऊस उत्पादकांचा नोंदणी न झालेला आणि गाळपास उपलब्ध असलेल्या सर्व ऊसाचे गाळप होईल याबाबत दक्षता घेण्याबाबत कारखान्यांचे कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, शेतकी अधिकारी, केन मॅनेजर यांना साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळविले आहे. ऊस नियंत्रण आदेश 1966 तसेच महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण, गाळप आणि ऊस पुरवठा नियमन) आदेश 1984 मधील तरतुदीनुसार व गाळप परवान्यातील अटीनुसार साखर आयुक्त कार्यालयाच्या परवानगीशिवाय साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद करू नये. तसेच प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या परिपत्रकीय सूचनांनुसार कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
सूचना देवूनही ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊस तोडणीकरीता पैशाची मागणी होत असल्यास संबधीत कारखान्याच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कोणत्याही ऊस उत्पादकांना ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी कंत्राटदार, ऊस तोडणी मजूर व कारखाना प्रतिनिधी यांनी पैशाची मागणी केल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करावी, असेही प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर मिलिंद भालेराव यांनी कळविले आहे.