महसूल सप्ताह यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सक्रियेतेने सहभागी व्हावे ;* *महसूल सप्ताहाचे सूक्ष्म नियोजन करुन जनतेला अधिकाधिक लाभ होण्यासाठी प्रयत्न करावेत*
*महसूल सप्ताह यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सक्रियेतेने सहभागी व्हावे ;*
*महसूल सप्ताहाचे सूक्ष्म नियोजन करुन जनतेला अधिकाधिक लाभ होण्यासाठी प्रयत्न करावेत*
*_विभागात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन_*
*नाशिक, दि. 31 जुलै, 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा) :*
1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने विभागात 1 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. या सप्ताहात सर्व अधिकाऱ्यांनी सक्रियेतेने सहभागी होवून महसूल विभागाशी संबंधित योजना, दाखले यासोबतच सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जावर कालमर्यादेत निपटारा करण्यासाठी नियोजन करुन जनतेला अधिकाधिक लाभ होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही श्री गमे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात महसुल सप्ताह, ई-चावडी, ई-हक्क प्रणाली, ई-फेरफार आदी विषयांचा आढावा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच अपर आयुक्त निलेश सागर, उपायुक्त (सा. प्र.) रमेश काळे, उपायुक्त (रोहयो) प्रज्ञा बडे- मिसाळ, उपायुक्त (करमणूक कर) राणी ताटे, उपायुक्त (नगरपालिका) संजय दुसाने, उपायुक्त (पुनर्वसन) मंजिरी मनोलकर, उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेवार, सहायक आयुक्त (भुसुधार) कुंदन सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते.
तरी विभागात 1 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या महसुल सप्ताहात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सर्व घटकातील मान्यवर व्यक्ती तसेच विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून हा महसूल सप्ताह नियोजनपूर्व साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.
*असा असेल महसूल सप्ताह*
➡️दि.1 ऑगस्ट, 2023 – “महसूल दिन” साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ
➡️ दि.2 ऑगस्ट, 2023 – “युवा संवाद”
➡️ दि.3 ऑगस्ट,2023- “एक हात मदतीचा”
➡️दि.4 ऑगस्ट,2023- “जनसंवाद”
➡️दि.5 ऑगस्ट,2023- “सैनिक हो तुमच्यासाठी”
➡️ दि.6ऑगस्ट,2023- “महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद”
➡️ दि.7 ऑगस्ट,2023- “महसूल सप्ताह सांगता समारंभ”
*विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या महसूल दिनाच्या शुभेच्छा*
विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या संदेशात महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नाशिक महसूल विभागातील कोतवाल, पोलिस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, अव्वल कारकुन नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांनी श्री गमे यांनी शुभेच्छा दिल्या.
आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की ‘महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. आपत्तीमध्ये जनतेच्या मदतीला प्रथम धावून जाणारे, निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेऊन लोकशाहीची धुरा आपल्या खांद्यावर वाहणारे कायदा व सुव्यवस्थेचे चालक आणि गतिमान प्रशासनाचे सुकाणू असणाऱ्या सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्री गमे यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावर्षी महसूल सप्ताह साजरा केला जात आहे. जनतेप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून, नागरिकांची कामे सहज, सुलभ व वेळेवर व्हावी, या संकल्पनेतून हा सप्ताह साजरा करावयाचा आहे. लोकांपर्यंत पोहचून सुसंवाद साधण्याचा शासनाचा हेतू आपण साध्य करुन दाखवू. या सप्ताहात गतिमान प्रशासन तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा महसूली बाणा दाखवूया’, असेही श्री गमे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.