अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात एक लाख 52 हजारांचा* *प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त* *: सहाय्यक आयुक्त उ. सि. लोहकरे*
*अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात एक लाख 52 हजारांचा*
*प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा जप्त*
*: सहाय्यक आयुक्त उ. सि. लोहकरे*
*नाशिक, दिनांक 27 जुलै 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा):*
अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री बाबत कठोर धोरण स्वीकारले आहे.त्याचाच एक भाग म्हणून आडगाव परिसरातील मे. महालक्ष्मी ट्रेडर्स येथे छापा टाकला असता मे. महालक्ष्मी ट्रेडर्स येथे एक लाख 52 हजार 744 रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा हस्तगत झाला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे यांनी दिली आहे.
आडगांव परिसरातील मे. महालक्ष्मी ट्रेडर्स, देवी खंडेराव मंदिरासमोर, आडगांव, पंचवटी, नाशिक चे मालक प्रशांत कचरू सावळकर यांच्या पेढीवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकुन पेढीची झडती घेतली असता दोन हजार 675 किंमतीचा, पेढीच्या गाडी क्रमांक MH-15-HG-1699 मध्ये 45 हजार 789 किंमतीचा तर प्रशांत सावळकर यांच्या राहत्या घरी एक लाख चार हजार 280 किंमतीचा असा एकूण एक लाख 52 हजार 744 रूपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गुटखा, सुगंधीत तंबाखु, पानमसाला व तत्सम पदार्थांची साठवणूक केल्याने आडगाव पोलिस स्टेशन येथे फिर्याद नोंदविण्यात आली आहे. तसेच वाहनात प्रतिबंधित अन्न पदार्थ सापडले असल्याने वाहन जप्त करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दुकान देखील सील करण्यात आले आहे. नाशिक विभागाचे सह आयुक्त (अन्न) सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) मनिष सानप, अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री गो. वि. कासार, अमित रासकर, प्रमोद पाटील, अविनाश दाभाडे व श्रीमती सु. दे. महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे,असे ही सहाय्यक आयुक्त उ.सि. लोहकरे यांनी कळविले आहे.
नागरिकांना प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा, वाहतुक व विक्री केल्याचे आढळून आल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन ही सहाय्यक आयुक्त श्री. लोहकरे यांनी केले आहे.
0000000000