मिशन भगीरथ प्रयास उपक्रमामुळे जलस्त्रोत संवर्धनास लाभ* *: केंद्रीय नोडल अधिकारी राय महिमापत रे*
*मिशन भगीरथ प्रयास उपक्रमामुळे जलस्त्रोत संवर्धनास लाभ*
*: केंद्रीय नोडल अधिकारी राय महिमापत रे*
*नाशिक, जनमत दि. 17 जून, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
मिशन भगीरथ प्रयास या उपक्रमामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे संवर्धन होण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम भविष्यात सातत्याने राबविण्यासाठी नियोजन करण्यात यावे, असे प्रतिपादन जलशक्ती अभियानचे केंद्रीय नोडल अधिकारी राय महिमापत रे यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जलशक्ती अभियानाच्या अंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करून आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपवनसंरक्षक उमेश वावरे, केंद्रीय जलशक्ती अभियानाचे तांत्रिक अधिकारी पंकज बक्षे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय नोडल अधिकारी राय महिमापत रे म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पातळीवर करण्यात आलेली कामे समाधानकारक असून या कामांची शहरी भागात व्याप्ती वाढविण्यात यावी. तसेच जिल्हा परिषदे मार्फत राबविण्यात येणारे मिशन भगीरथ प्रयास या उपक्रमातील पहिल्या वर्षातील झालेली कामे अतिशय उत्कृष्ट आहेत. या कामांचे सातत्य टिकवण्यासाठी मिशन भगीरथ प्रयास उपक्रम अजून पुढील काही वर्ष सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी या उपक्रमाचा सविस्तर प्रस्ताव तयार करून केंद्र शासनास सादर करावा, असेही केंद्रीय नोडल अधिकारी महिमापत रे यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय पथकामार्फत दोन दिवसीय दौऱ्यात जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील नाशिक, पेठ व येवला तालुक्यात झालेल्या कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी पेठ तालुक्यातील आसारबारी येथील प्राथमिक शाळा तसेच अमृत सरोवर योजनेंतर्गत तयार केलेल्या पाझर तलावाची पाहणी केली. त्याचप्रमाणे कोपूर्ली येथे अमृत सरोवर योजनेंतर्गत केलेले नाला रुंदीकरणाचे काम, मौजे जोगमोडी, आमडोंगरा व आंबे यागावांत सुरू असलेल्या कामांनाही केंद्रीय पथकाने भेट दिली