क्रीडा विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी* *प्रस्ताव सादर करावेत* *: सुनंदा पाटील*
*क्रीडा विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी*
*प्रस्ताव सादर करावेत*
*: सुनंदा पाटील*
*नाशिक: दिनांक 27 जून, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
राज्य शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत जिल्हास्तरावर सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती उपयोजना या घटकांमध्ये व्यायामशाळा विकास योजना, क्रीडांगण विकास योजना व युवक कल्याण योजना या योजनांसाठी अनुदान देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.
*या योजनांसाठी प्रस्ताव सादर करा…*
*_व्यायामशाळा विकास योजना :_* या योजनेमध्ये नवीन व्यायाम शाळा बांधकाम करणे, व्यायामशाळा इमारत नुतनीकरण करणे, व्यायामशाळा साहित्य खरेदी व खुले व्यायामशाळा साहित्य यासाठी रुपये 7 लक्ष कमाल मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात येते.
*_क्रीडांगण विकास योजना :_* या योजनेत क्रीडांगण समपातळीत करणे, 200/400 मीटर धावणपथ तयार करणे भिंतीचे/तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांचे एक किंवा अधिक प्रमाणात क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह/चेंजिंग रूम बांधणे, पिण्याचे व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, भांडारगृह बांधणे, फ्लड लाइटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्था तयार करणे, तसेच त्यावर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था तयार करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींगसाठी हँड मिनी रोलर, खरेदी करणे यासाठी सात लक्ष कमाल मर्यादेपर्यंत तर क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी तीन लाख अनुदान मंजूर करण्यात येते.
*_युवक कल्याण योजना :_* यामध्ये ग्रामीण व नागरी भागातील नोंदणीकृत युवक मंडळांना आर्थिक सहाय्य व समाजसेवा शिबीरे भरविणे या प्रकारामध्ये नोंदणीकृत युवक मंडळांना स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर, सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी पात्र संस्थांना कमाल रुपये 25 हजार एवढे अनुदान मंजूर करण्यात येते.
या क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव ऑगस्ट, 2023 अखेर जिल्हा क्रीडा कार्यालय, नाशिक येथे सादर करावेत, असे आवाहन ही जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.