आरोग्य व शिक्षण

*स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत* *:सुंदरसिंग वसावे*

*स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत*
*:सुंदरसिंग वसावे*
*नाशिक दि. 01 जून, 2023नाशिक जनमत वृत्तसेवा):*
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2016 -17 या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण नाशिकचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर निश्चित केलेली रक्कम उपलब्ध करून देण्यात येते. नाशिक शहरासाठी विद्यार्थ्यांना भोजन भत्ता रूपये 28 हजार, निवास भत्ता रूपये 15 हजार व निर्वाह भत्ता रूपये 8 हजार असे एकूण रूपये 51 हजार प्रति विद्यार्थी लाभाचे स्वरूप आहे. या रकमेच्या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रूपये 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रूपये 2 हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येते. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापर्यंत जिल्ह्यातील एकूण 750 विद्यार्थ्यांना एकूण रूपये 37 लाख 50 हजार इतक्या रकमेचा लाभ अदा करण्यात आला आहे.

योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांला इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थी अुन.जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रूपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी स्थानिक असावा व त्याने स्वत:चे आधार क्रमांक राष्ट्रियकृत बँकेशी संलग्न केलेला असावा. 12 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम 2 वर्षापेक्षा कमी नसावा. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणमर्यादा 40 टक्के आवश्यक आहे. विद्यार्थी वसतिगृहात प्रवेशित नसावा व जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच नाशिक मनपा हद्दीच्या 5 कि.मी परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असणे आवश्यक आहे.

स्वाधार योजनेसाठी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण नाशिक कार्यालयात विनामुल्य अर्ज उपलब्ध आहेत.. अर्जासोबत विद्यार्थ्यांनी भाडे तत्वावर राहणाऱ्या भाडेकरार व शेवटचा वर्ग पास झाल्याची गुणपत्रिका जोडावी व संपर्कासाठी त्याचा चालू स्थितीतील संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांनी अर्जासोबत तपासणी सूचीतील कागदपत्रांप्रमाणे परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नाशिक नासर्डी पुलाजवभ्, नाशिक-पुणे रोड, नाशिक कार्यालयात सादर करावा. अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष अथवा 0253-2975800 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे