आरोग्य व शिक्षण

जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ प्रभावीपणे राबविणार* *: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.*

 

*जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ प्रभावीपणे राबविणार*
*: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.*…

*नाशिक, दिनांक : 14 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये इयत्ता 12 वी च्या 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 व इयत्ता 10 वी च्या 2 मार्च ते 25 मार्च, 2023 या कालावधीत लेखी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्‍या परीक्षांचे संचलन सुयोग्य प्रकारे होवून त्या परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले.

जिल्ह्यात इयत्ता 12 वी च्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 108 केंद्रांवर 74 हजार 932 तर इयत्ता 10 वी च्या 203 केंद्रांवर 91 हजार 669 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या लेखी परीक्षा सुरळीत, शांततेत व कॉपीविरहीत पार पडण्याकरिता शिक्षण विभागासह महसूल व जिल्हा परिषदेशी संलग्न असलेल्या इतर विभागांकडून संनियंत्रण करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांची अतिसंवेदनशील, संवेदनशील, उपद्रवी व सर्वसाधारण अशी वर्गवारी करण्यात आली असून कॉपीचे प्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त व पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी हे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर आकस्मितपणे भेटी देणार आहेत.

परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक म्हणून एकाच शाळेचे अथवा संस्थेचे सर्व शिक्षक त्याच परीक्षा केंद्रावर न नेमता, मुळ शाळेचे काही शिक्षक व इतर शाळांचे काही शिक्षक अशा पद्धतीने पर्यवेक्षक नेमण्यात यावेत. तसेच परीक्षेला आल्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी. परीक्षेचे गोपनीय साहित्य नेणाऱ्या कर्मचाऱ्याचे लाईव्ह व जीपीएस लोकेशन घेतले जाणार असून परीक्षा कामी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणीही अनधिकृत व्यक्ती परीक्षा केंद्रांवर आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच विद्यार्थी कॉपी करतांना आढळल्यास विद्यार्थ्यावर व या गैरप्रकारात सहभागी व्यक्तीवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले आहे.

परीक्षा सुरू होण्यास अजूनही काही कालावधी असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा सराव करून आत्मविश्वासाने व निर्भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
00000000000

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे