दुर्गम भागातील भटक्या विमुक्त जमातीमधील* *मतदारांची नाव-नोंदणी करण्यासाठी विशेष अभियान* *:मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे*
*दुर्गम भागातील भटक्या विमुक्त जमातीमधील*
*मतदारांची नाव-नोंदणी करण्यासाठी विशेष अभियान*
*:मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे*
*नाशिक: दिनांक 3 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
जिल्हा व तालुका स्तरावर दुर्गम भागातील भटक्या विमुक्त जमातीतील मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. मतदान कार्ड सोबतच इतर महत्वाचे दस्तऐवज जसे रेशन कार्ड, आधार कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी या विशेष अभियानात महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
राज्यातील दुर्गम भागातील भटक्या विमुक्त जमातीमधील मतदारांची नांव नोंदणी करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष अभियान राबविणेबाबत 2 ऑगस्ट 2023 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12.00 वाजता दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस नाशिक जिल्ह्यासाठी भटक्या विमुक्त जमाती करीता कार्य करणारे समाज सेवक शरद बोडके यांना जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे आमंत्रित केले होते अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली आहे.
या बैठकीत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी भटक्या व विमुक्त जाती व आदिवासी समाजाच्या कागदपत्राविषयी मुद्दे उपस्थित करून चर्चा करण्यात आली. वंचित समूहातील जातींना मतदान कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, जातीचे दाखले काढण्याच्या संदर्भातील अडचणी व्यक्त केल्या. बऱ्याच भटक्या विमुक्त जाती आणि आदिवासी समाजाकडे ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांना ही कागदपत्रे मिळत नाहीत. तेव्हा शासनाने महसूल विभागाअंतर्गत तालुकानिहाय व पाडे-वस्त्यांवर कॅम्प घेऊन त्यांना मतदान कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, जातीचे दाखले, निराधार योजनेचे लाभ देण्याची कार्यवाही
करून भटक्या व विमुक्त जाती व आदिवासी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करावे असे मत विविध कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केले. भटक्या विमुक्त समाजाचे जेष्ठ नेते श्री. बाळकृष्ण रेणके यांनी या वंचित समूहाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे मिळवून देण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम आखण्यात यावा असे मत यावेळी बैठकीत मांडले.
नाशिक जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न यावेळी समाजसेवक श्री. शरद काशिनाथ बोडके यांनी बैठकीत मांडले. तालुकास्तरावर विशेष नियोजन करून मतदार नोंदणी अधिकारी, तहसिलदार व इतर विभागांचे अधिकारी यांचे स्तरावरून विशेष मोहीम राबविण्यात येईल. तरी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या विशेष मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केल्याची माहीती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी कळविली आहे.