आदिवासी बांधवांसाठी राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव व गुणगौरव सोहळा.
दिनांक: 31 जुलै, 2022
*आदिवासी बांधवांसाठी राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव*
*व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन*
*:वर्षा मीना*
*नाशिक, दिनांक: 31 जुलै, 2022(जिमाका वृत्तसेवा):* आझादी का अमृत महोत्सवांतर्गत आदिवासी बांधवांसाठी नागपूर व अमरावती येथे 9 ते 14 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आदिवासी बांधवांनी 3 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, आदिवासी व्यक्ती, विद्यार्थी, आदिवासी स्वातंत्र्य विरांचे कुटुंब, हस्तकलाकार, बचतगट, वनधन केंद्र, वन औषधी संग्राहक, आदिवासी पारंपारिक नृत्य कलाकार, आदिवासी कलाकारांचा यथोचित सन्मान समारंभ इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी इच्छुक व पात्र आदिवासी बांधवांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक या कार्यालयात आपली संपूर्ण माहिती, बँक पास बुक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, आय. एफ. सी. कोड बँक शाखेचे नाव व संपुर्ण पत्ता, जातीचा दाखला, आधार कार्ड आदी कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री. मीना यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमांतर्गत राज्यातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर गौरवास्पद कामगिरी केलेल्या आदिवासी व्यक्तींचा व विद्यार्थ्यांचा तसेच स्वातंत्र्य विरांच्या कुटुंबाचा गौरव करण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांच्या हस्तकलांचे प्रदर्शन, रानभाज्या स्टॉल, खाद्यपदार्थ, बचत गट, वनधन केंद्र व वन औषधी इत्यादींची विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. तसेच या कालावधीत आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धांचे आयोजन व आदिवासी जीवनावर आधारीत लघुपट व माहितीपटही दाखविण्यात येणार आहे. यावेळी आदिवासी बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप, सन्मान चिन्ह, रोख बक्षिस, निवास व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी दिली आहे.
0000000000