उज्वल भारत उज्वल भविष्य अभियानागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीद्वारे संवाद कार्यक्रम संपन्न.
दिनांक: 30 जुलै, 2022
*‘उज्ज्वल भारत..उज्ज्वल भविष्य’ अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्यप्रणाली द्वारे संवाद कार्यक्रम संपन्न*
*केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची कालिदास कलामंदिर येथील संवाद कार्यक्रमास उपस्थिती*
*नाशिक, दिनांक: 30 जुलै, 2022 (जिमाका वृत्तसेवा)*
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या ‘उज्ज्वल भारत..उज्ज्वल भविष्य पावर@2047’ या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे देशातील नागरिकांशी संवाद साधला. कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार प्रा. देवयानी फरांदे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून आधुनिक वीज वितरण प्रणालीशी संबंधित पुनरूत्थान आधारीत वितरण क्षेत्र योजना, नॅशनल रुफटॉप सोलर पोर्टल अशा विविध योजनांचे उद्धघाटन व लोकार्पण यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ‘उज्ज्वल भारत..उज्ज्वल भविष्य’ या ऊर्जा महोत्सवाला शुभेच्छा देतांना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, ऊर्जा क्षेत्राला गती देण्यासाठी विद्युत विभागाच्या विविध योजनांपासून कोणीही वंचित राहू नये याकरिता या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमास एकलहरे निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे, प्रशिक्षण व सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर, पायाभूत आराखड्याचे अधीक्षक अभियंता संजय खंदारे, नाशिक महावितरण मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, स्वाती भामरे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने कालिदास कलामंदिर येथे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, ऊर्जा क्षेत्रात देशाला सक्षम होण्यासाठी 1500 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये प्रामुख्याने स्मार्ट मिटरींगसाठी 732 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनामार्फत सर्वोतोपरीने मदत करण्यात येईल. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरिकांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भर देण्यात येत आहे. सर्वांगीण विकास साधत असतांना त्यात वीज निर्मिती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून 25 ते 31 जुलै दरम्यान सुरू असलेल्या ‘उज्ज्वल भारत..उज्ज्वल भविष्य’ अभियान ऊर्जा महोत्सवाच्या निमित्ताने ऊर्जा विभागाच्या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी लोकसहभाग देखील महत्वाचा आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.
आज केंद्र शासनामार्फत पुनरुत्थान वितरण क्षेत्र योजना (RDSS) या प्रकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला असून ही योजना 3 लक्ष कोटी रूपयांची आहे. या योजनेतून 1.50 लाख कोटी रुपये हे स्मार्ट मीटर साठी वापरले जाणार आहेत. उर्वरित 1.50 लाख कोटी रुपये नवीन विद्युतीकरण, नवीन ट्रान्सफॉरमर, Scada system (supervisory control and data acquisition ) यासाठी महाराष्ट्र करिता 36 हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले असून याला केंद्र स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प एक च्या माध्यमातून 40 कोटीं रुपयांची कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आली असून याअंतर्गत सिन्नरचे विजयनगर आणि सरगवाडी, नाशिकचा एकलहरे, मालेगावचे सायनी टेक्सटाईल्स पार्क, सायने म्हाडा, संगमेश्वर आणि नांदगांव असे एकुण सात उपकेंद्र कार्यन्वित करण्यात आले आहेत. तसेच एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प दोन अंतर्गत शहरी भागामध्ये विद्युत वाहिन्यांचे आणि उपकेंद्रांचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. नाशिक शहर व मालेगांव तालुक्यात आतापर्यंत 52 कोटी रुपयांची कामे करण्यात आली असून यामध्ये 463 ट्रान्सफार्मरची काम करण्यात आली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
दीनदयाळ ग्रामज्योती योजनेमधून त्र्यंबकेश्वर येथील डहाळेवाडी, येवल्यातील सावरगांव, वडनेर, विराणे, मालेगाव येथील उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. सावरगांव अंतर्गत नांदूर, धानोरा या गावांना नियमितपणे योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी नियोजन करण्यात येत असून या योजनेंतर्गत भाग दोन मध्ये 293 डीपी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून वीज निर्मितीची कामे सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतीला रात्री ऐवजी दिवसा पाणी देणे सुलभ होत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून ऊर्जा विभागामार्फत जिल्ह्यात साधारण 132.52 कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती देखील केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंघ यांचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आभार मानले.