कुंभ म्हणजे श्रद्धेचा महासंगम; माणुसकी, समता आणि आत्मशुद्धीचा महोत्सव*
हभप इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून उलगडले सिंहस्थ महाकुंभाचे आध्यात्मिक महत्त्व;*

*कुंभ म्हणजे श्रद्धेचा महासंगम; माणुसकी, समता आणि आत्मशुद्धीचा महोत्सव*
*हभप इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून उलगडले सिंहस्थ महाकुंभाचे आध्यात्मिक महत्त्व;*
*गोदावरी स्वच्छतेसह नाशिककरांच्या सहभागाचे केले आवाहन*
*नाशिक, दि. ३० ऑगस्ट ( नासिक जनमत वृत्तसेवा)* : सिंहस्थ महाकुंभ हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, ज्ञान, साधना, समता, सेवा आणि मानवतेचा विराट संगम आहे. कुंभाच्या निमित्ताने विविध संप्रदाय, आखाडे, संत-महंत आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक एका आध्यात्मिक प्रवाहात एकत्र येतात. या महासंगमाचे महत्त्व प्रत्येक नाशिककराने जाणून घेत त्यात आपली जबाबदारीही पार पाडावी आणि आगामी सिंहस्थ महाकुंभमेळा यशस्वी करावा, असे आवाहन हभप श्री. इंदुरीकर महाराज यांनी केले.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयोजित तीन दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्तीसंगम कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी कुंभाची संकल्पना, समुद्रमंथनाची पौराणिक कथा, अमृतकुंभाची परंपरा आणि नाशिक-त्र्यंबकेश्वरचे आध्यात्मिक महत्त्व यांचा सुंदर उलगडा केला.


कुंभ म्हणजे नेमके काय, या प्रश्नापासून आपल्या निरूपणाची सुरुवात करताना इंदुरीकर महाराज यांनी दहीहंडीचे उदाहरण देत ‘कुंभ’ या संकल्पनेचा व्यापक अर्थ स्पष्ट केला. कुंभ हा केवळ मातीचा घट नसून त्यामध्ये जीवन, श्रद्धा आणि संस्कृती सामावलेली आहे. समुद्रमंथनातून अमृत प्राप्त झाले आणि त्या अमृतकुंभाशी नाशिक-त्र्यंबकेश्वरसह चार तीर्थक्षेत्रांची परंपरा जोडली गेली आहे. त्यामुळे नाशिकचा सिंहस्थ हा हजारो वर्षांच्या श्रद्धा व अध्यात्मिक परंपरेचा वारसा असल्याचे त्यांनी सांगितले.
*समुद्रमंथनाचा जीवनाशी संबंध*
देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून प्रथम हलाहल विष बाहेर पडले आणि त्यानंतर विविध रत्ने व अखेरीस अमृत प्राप्त झाले. या कथेतून जीवनाचेही एक मोठे तत्त्वज्ञान समोर येते. जीवनाचे मंथन झाले की त्यातून सुख-दुःख, चांगले-वाईट, संकटे आणि संधी सर्व काही समोर येते. संकटाच्या वेळी भगवान शंकरांनी हलाहल विष धारण करून सृष्टीचे रक्षण केले, ही त्यागाची आणि परोपकाराची शिकवण आहे.
भगवद्गीतेतील “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या संदेशाचा संदर्भ देत त्यांनी कर्म करताना फलाची अपेक्षा न ठेवता समाजहितासाठी कार्य करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच “समत्वं योग उच्यते” या गीतेतील तत्त्वानुसार सुख-दुःख, लाभ-हानी आणि मान-अपमान यापलीकडे जाऊन समत्वाची भावना जोपासणे, हाच अध्यात्माचा खरा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
*कुंभ सर्वांचा; भेदाभेदाला येथे स्थान नाही*
कुंभ हा कोणत्याही एका संप्रदायाचा नसून तो सर्वांचा आहे, असे स्पष्ट करताना इंदोरीकर महाराज यांनी शैव, वैष्णव, वारकरी, नाथ तसेच विविध आखाडे, साधू-संत आणि कीर्तन परंपरांचा उल्लेख केला. कुंभाच्या या महासंगमात कोणाची जात, कुळ, श्रीमंती किंवा प्रतिष्ठा पाहिली जात नाही; पाहिली जाते ती केवळ श्रद्धा आणि भक्ती. म्हणूनच कुंभ हा भारतीय समाजातील विविधतेला एका आध्यात्मिक धाग्यात गुंफणारा उत्सव आहे, असे त्यांनी सांगितले.
गीतेतील “विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि । शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥” या श्लोकाचा आशय स्पष्ट करताना प्रत्येक जीवाकडे समत्वाने पाहण्याची भारतीय संस्कृतीची शिकवण त्यांनी अधोरेखित केली. माणसामाणसांतील भेद दूर करून सर्वांना एकत्र आणणारी कुंभाची परंपरा याच विचारांची प्रत्यक्ष अनुभूती देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
*रामभूमी, संतभूमी आणि अमृतभूमी नाशिक*
नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसराचे महत्त्व केवळ सिंहस्थामुळे नाही. प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या वास्तव्यामुळे ही भूमी रामायण परंपरेशी जोडली गेली आहे. गोदावरीच्या पावन तीरावर संत, साधू आणि भक्तांची समृद्ध परंपरा निर्माण झाली. त्यामुळे नाशिक ही रामभूमी, संतभूमी आणि अमृतभूमी असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात विविध संतपरंपरांनी दिलेले योगदानही त्यांनी अधोरेखित केले. संतांच्या वाणीने आणि भक्तीच्या प्रवाहाने ही भूमी पिढ्यान्पिढ्या समाजाला ज्ञान, भक्ती आणि माणुसकीचा संदेश देत आली आहे.
*गोदावरी मातेचे पावित्र्य जपणे ही नाशिककरांची पहिली जबाबदारी*
सिंहस्थ महाकुंभ हा केवळ शासन किंवा प्रशासनाचा कार्यक्रम नाही, तर तो प्रत्येक नाशिककराचा महोत्सव आहे, असे सांगून इंदोरीकर महाराज यांनी नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले.
महाकुंभासाठी शासन-प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण करण्यात येतील; मात्र त्या सुविधांचा योग्य वापर करणे आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. गोदावरी नदी ही केवळ नदी नसून नाशिककरांच्या श्रद्धेतील ‘गोदावरी माता’ आहे. ज्या नदीमध्ये आपण आपल्या पूर्वजांच्या अस्थी व रक्षा विसर्जित करतो, ज्या नदीला आपण पवित्र मानतो, त्याच नदीत कचरा टाकणे योग्य नाही. महाकुंभाच्या काळात लाखो भाविक गोदावरीच्या तीरावर येणार आहेत. त्यामुळे ‘गोदावरी स्वच्छ ठेवू, गोदावरीचे पावित्र्य जपू’ हा संकल्प प्रत्येक नाशिककराने करावा, असे आवाहन त्यांनी केले.
*संपत्ती नव्हे, माणुसकी हेच खरे अमृत*
हिरा, सोनं, वस्त्र किंवा भौतिक संपत्ती यांना जगात किंमत असली तरी त्यातून जीवनाचे खरे समाधान मिळत नाही. जीवनाचे खरे अमृत प्रेम, करुणा, ज्ञान, सेवा आणि माणुसकीमध्ये आहे, असा संदेश इंदोरीकर महाराज यांनी दिला.
भगवद्गीतेतील “अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च” या विचाराचा संदर्भ देत प्रत्येक जीवाबद्दल मैत्री, करुणा आणि आपुलकीची भावना ठेवणे हेच खरे अध्यात्म असल्याचे त्यांनी सांगितले. संकटाच्या वेळी दुसऱ्याच्या पाठीशी उभे राहणे, गरजवंताला मदतीचा हात देणे आणि समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणे म्हणजेच माणुसकी. त्यामुळे सिंहस्थाच्या निमित्ताने केवळ दर्शन आणि स्नान न करता आपल्या आचरणाचेही मंथन करावे आणि त्यातून माणुसकीचे अमृत बाहेर काढावे, असा संदेश त्यांनी दिला.
*कुंभ म्हणजे आत्ममंथनाचा आणि मानवतेचा महोत्सव*
कुंभाच्या पौराणिक कथेमागे दडलेला संदेश आजच्या समाजासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. समुद्रमंथनातून अमृत मिळाले; त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाचे मंथन केले तर त्यातून ज्ञान, प्रेम, सेवा आणि करुणेचे अमृत प्राप्त होईल. गीतेतील “उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्” या संदेशाचा आधार घेत स्वतःचा विकास करताना समाजाच्या कल्याणाचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ महाकुंभ हा केवळ गर्दीचा, धार्मिक विधींचा किंवा परंपरांचा उत्सव नसून स्वतःच्या अंतर्मनाचे मंथन करून माणुसकीचे अमृत शोधण्याचा महासोहळा आहे, असा भावपूर्ण संदेश देत हभप इंदुरीकर महाराज यांनी कुंभमेळा यशस्वितेसाठी प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांचे आपल्या कीर्तनातून कौतुक केले.
प्रत्येक नाशिककराने स्वच्छता, सेवा, शिस्त, माणुसकी आणि एकजुटीच्या भावनेतून सिंहस्थात योगदान दिल्यास नाशिक देशासमोर आदर्श निर्माण करू शकते. प्रभू श्रीरामांच्या पावन वास्तव्याची पुण्याई लाभलेल्या नाशिकने संतसेवा आणि स्वच्छतेच्या माध्यमातून या सिंहस्थाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तीन दिवस रंगलेल्या ‘कुंभ भक्ती संगम’मध्ये देशभरातील विविध संतपरंपरा, कीर्तन, अभंग, गुरबाणी, संकीर्तन आणि भक्तिसंगीताचा अनुभव रसिकांना मिळाला. ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘तीन्ही माझ्या मना’ आणि ‘अनंत जन्मिचे विसरत दुःख, पाहा तुझे मुख पांडुरंगा’ अशा अभंगांच्या भक्तिमय सादरीकरणाने समारोप सोहळा अधिक भावपूर्ण झाला. अखेरीस ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रभावी कीर्तनाने ‘कुंभ भक्ती संगम’चा भक्तिमय समारोप झाला.
यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, हजारो नाशिककर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



