नाशिकच्या हरित सार्वजनिक वाहतुकीला नाशिक महानगरपालिकेच्या गॅप फंडिंगची साथ; मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण

नाशिकच्या हरित सार्वजनिक वाहतुकीला नाशिक महानगरपालिकेच्या गॅप फंडिंगची साथ; मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण
नाशिक : जनमत नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. केंद्र शासनाच्या पीएम-ई बस सेवा योजनेंतर्गत नाशिक शहरासाठी मंजूर झालेल्या १२ मीटर लांबीच्या ५० ई-बसेसचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमांतर्गत ठक्कर डोम येथे लोकार्पण सोहळा पार पडला.
केंद्र शासनाच्या अनुदानासोबतच ई-बसेसच्या परिचालनासाठी आवश्यक गॅप फंडिंग नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात येणार असून, शहराच्या हरित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतुकीला यामुळे आर्थिक बळ मिळणार आहे.
या ई-बसेसच्या आगमनामुळे नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती मिळणार असून, नागरिकांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढल्याने नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीकडे कल वाढण्यास मदत होणार आहे.
बसेस
खर्च प्रति किमी (CPKM)
उत्पन्न प्रति किमी (EPKM)
तोटा
सीएनजी
९७/-
४८/-
४९/-
डिझेल
७७/-
४२/-
३५/-
ई बस
८३ खर्च – २४ अनुदान = ५९/-
४८/-
११/-
ई-बसेसच्या परिचालन खर्चात बचत; गॅप फंडिंग नाशिक महानगरपालिकेकडून
ई-बसेसच्या परिचालनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या खर्चातही लक्षणीय बचत होणार आहे. सध्या सीएनजी बसच्या परिचालनासाठी सरासरी ९७ रुपये, तर डिझेल बससाठी सुमारे ७७ रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो. पीएम-ई बस सेवा योजनेंतर्गत ई-बसेसचा अपेक्षित खर्च ८३ रुपये प्रति किलोमीटर असून, केंद्र शासनाकडून २४ रुपये प्रति किलोमीटर अनुदान मिळणार आहे. उर्वरित गॅप फंडिंग नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात येणार असून, त्यामुळे ई-बसेसचा प्रत्यक्ष खर्च ५९ रुपये प्रति किलोमीटर इतका राहणार आहे.
परिणामी, सीएनजी बसच्या तुलनेत प्रति किलोमीटर ३४ रुपये, तर डिझेल बसच्या तुलनेत २४ रुपये बचत होणार आहे. परिचालन खर्चातील ही बचत नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार
ई-बसेस पर्यावरणपूरक असल्याने नाशिक शहरातील प्रदूषण कमी करण्यास तसेच पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार आहे. ई-बसेसचे संचालन तुलनेने कमी आवाजात होत असल्याने ध्वनी प्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा आहे.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासही हातभार लागणार आहे. त्यामुळे नाशिकच्या शाश्वत आणि हरित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार आहे.
नाशिकला लवकरच आणखी ५० ई-बसेस येणार
नाशिक शहराची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता भविष्यात आणखी ५० ई-बसेसची मागणी करण्यात आली आहे. या टप्प्यात ९ मीटर लांबीच्या ई-बसेस उपलब्ध होणार असून, त्यातून शहरातील विविध भागांमध्ये बससेवेचा विस्तार, नवीन मार्गांवर सेवा सुरू करणे आणि विद्यमान मार्गांवरील फेऱ्या वाढविणे शक्य होणार आहे.

डिझेल बसेसचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी होणार
नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी टप्प्याटप्प्याने डिझेल बसेसची संख्या कमी करून इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे परिचालन खर्चात बचत होण्यासोबतच प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार आहे.
“हरित नाशिक – सक्षम सार्वजनिक वाहतूक – शाश्वत नाशिक” या संकल्पनेला या ई-बसेसमुळे बळ मिळणार असून, नाशिक शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

