मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन*
*मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती*

*मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन*
——————————————
*मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती*
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे सन 2003 साली नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे कालांतराने ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. सदर कृषी महाविद्यालय हे नुकतेच दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह अशा तीनही भव्य इमारतींचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती मा. श्री. बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष मा. श्री. विश्वासराव मोरे व सर्व शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रम नाशिकचे पालकमंत्री मा. ना. श्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री मा. ना. श्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री मा. ना. श्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. ना. श्री नरहरी झिरवाळ, कृषि मंत्री मा.ना. श्री. दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील माननीय खासदार व माननीय आमदार, नाशिक महापालिकेच्या महापौर श्रीमती हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर मा. श्री. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस मा. श्री ॲड. नितीन ठाकरे, सभापती मा. श्री. बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष मा. डॉ. श्री. सुनील ढिकले, उपाध्यक्ष मा. श्री. विश्वासराव मोरे, उपसभापती मा. श्री. डी. बी. मोगल, चिटणीस मा. श्री. दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक मा. श्री. प्रवीण जाधव आणि मविप्र समाज समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक व विद्यार्थी यांची उपस्थिती असेल.
नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्याची कृषी शिक्षणाची गरज व निकड या बाबींचा विचार करून मविप्र संस्थेने १ नोव्हेंबर २००३ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता कृषी शिक्षणाची कवाडे खुली केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करता यावे, या उद्देशाने शहरातील कृषी महाविद्यालय दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतरित करण्यात आले. तब्बल १४ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या याच प्रशस्त अशा महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच १४ एकर कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय विभाग, सुसज्ज असे भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, सर्व १० विभागांच्या सुसज्ज, अद्ययावत परिपूर्ण अशा प्रयोगशाळा व शिक्षण साहित्य साधनांनीयुक्त व्याख्यान कक्ष, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. चार वर्षांच्या बीएससी कृषी पदवी असलेल्या या कृषी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष १२० विद्यार्थी इतकी आहे. याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय व इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयसुद्धा सुरू आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी महाविद्यालयातील सर्व सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता तपासून महाविद्यालयास सन २०२२-२३ मध्ये ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. तसेच, सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’ यांच्यातर्फे महाविद्यालयास ‘कृषीभूषण-२०२४’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘KRUSHITHON 2024’ मध्ये ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक व ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यावर महाविद्यालयाचा जास्त भर आहे. शिक्षण संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांचा कृषी व आर्थिक विकास साधने हेच कृषी महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.



