ब्रेकिंग

गुरबाणीच्या सुरांनी दुमदुमला ‘कुंभ भक्ती संगम’;* *भाई मनिंदर सिंहजींच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद* *भक्ती, समर्पण आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश-

*गुरबाणीच्या सुरांनी दुमदुमला ‘कुंभ भक्ती संगम’;*

*भाई मनिंदर सिंहजींच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद*

*भक्ती, समर्पण आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश-

*नाशिक, दि. ३० ऑगस्ट नासिक जनमत  वृत्तसेवा) :* नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ मध्ये आज अमृतसर येथील श्री दरबार साहिबचे हजुरी रागी भाई मनिंदर सिंहजी यांच्या गुरबाणी शब्द कीर्तनाच्या भावपूर्ण सादरीकरणाने परिसर भक्तिमय झाला. गुरबाणीतील पवित्र शबद आणि भक्तिरचनांच्या सुमधुर सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

भाई मनिंदर सिंहजी यांनी ‘तू मेरो मेरो, मैं तेरी ओट गही’, ‘तू कुण रे’ आणि ‘बेअंता बेअंत गुण तेरे’ यांसह गुरबाणीतील विविध शबद व भक्तिरचना सादर केल्या. परमेश्वरावरील श्रद्धा, समर्पण आणि भक्तिभाव व्यक्त करणाऱ्या या रचनांनी उपस्थितांना आध्यात्मिक अनुभूती दिली. त्यांच्या गायनातून गुरबाणीची समृद्ध आध्यात्मिक आणि संगीत परंपरा प्रभावीपणे उलगडली.

यावेळी संबोधित करताना भाई मनिंदर सिंहजी यांनी धार्मिक स्थळी केवळ शरीराने उपस्थित राहणे पुरेसे नसून मन, श्रद्धा आणि अंतःकरणाने सहभागी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना मनापासून उपस्थित राहून परमेश्वराच्या चरणी समर्पित होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी भक्त नामदेवजींच्या ‘जिउ जिउ नामा हरि गुण उचरै’ या पावन शबदाचे सामूहिक गायन करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थितांनी शबद गायनात सहभाग घेतला. नामस्मरण, भक्ती आणि ईश्वराच्या गुणांचे चिंतन करण्याचा संदेश या सामूहिक गायनातून देण्यात आला.

 

भाई मनिंदर सिंहजी यांना गुरबाणी शबद कीर्तन सादरीकरणासाठी रणजीत सिंहजी, सतकिरत सिंहजी, गुरजिंदर सिंहजी यांनी साथ दिली. सादरीकरणानंतर कलाकार व सहकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल नवनीत सिंह सरना, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, डीएसएम, कमांडंट, स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘कुंभ भक्ती संगम’च्या माध्यमातून देशाच्या विविध भागांतील भक्ती, कीर्तन, संगीत आणि संतपरंपरांचा संगम घडविण्यात येत आहे. गुरबाणीच्या सादरीकरणातून भक्ती आणि समर्पणासोबतच विविधतेत एकता आणि राष्ट्रीय सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. यावेळी शीख बांधवांसह सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे