मागील अनेक प्रलंबित प्रश्न विद्यमान कार्यकारिणीला पूर्ण करावी लागताय : ॲड. नितीन ठाकरे*

*मागील अनेक प्रलंबित प्रश्न विद्यमान कार्यकारिणीला पूर्ण करावी लागताय : ॲड. नितीन ठाकरे*
मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात अपूर्ण राहिलेली अनेक कामे विद्यमान कार्यकारिणीला पूर्ण करावी लागत आहेत आणि ती जबाबदारी आम्ही सक्षमपणे पार पाडत आहोत. संस्थेवर आलेल्या सुमारे १३५ कोटी रुपयांच्या कर्जाचा भार आणि बांधकाम ठेकेदारांची देणी कमी करण्यापासून ते सध्या चर्चेत असलेल्या मविप्र रुग्णालयाच्या विषयापर्यंत अनेक प्रश्न आम्हाला वारशाने मिळाले आहेत.
मविप्र रुग्णालयासंदर्भातील सद्यस्थितीचाही उगम मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळातच आहे. त्या काळात आवश्यक परवानग्यांची मुदतवाढ अथवा त्यासंबंधीची कार्यवाही वेळेत होणे अपेक्षित होते; मात्र ती झाली नाही. त्यानंतर परिस्थिती बदलली, संबंधित कायदे व नियमांमध्ये बदल झाले आणि न्यायालयाचेही नवे आदेश आले. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून विद्यमान कार्यकारिणी कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर अत्यंत गांभीर्याने आणि समर्थपणे काम करीत आहे. या प्रश्नातून निश्चितपणे योग्य मार्ग काढला जाईल, असा आम्हाला विश्वास आहे.
संस्थेवर आलेल्या मोठ्या कर्जाची परतफेड आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने करीत आहोत; त्याच जबाबदारीने मविप्र रुग्णालयाचा प्रश्नही मार्गी लावला जाईल. त्यामुळे अशा संवेदनशील विषयांवर माध्यमांमधून आरोप-प्रत्यारोप अथवा अनावश्यक चर्चा करून संस्थेचे हित साधले जात नाही. संस्थेच्या प्रश्नांवर राजकारण करण्यापेक्षा ते सोडविण्यासाठी सकारात्मक योगदान देणे अधिक आवश्यक आहे.
मविप्रसारखी शतकोत्तर परंपरा असलेली संस्था ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका कार्यकारिणीची कामगिरी नाही. या संस्थेच्या वाटचालीचे खरे श्रेय कर्मवीरांच्या त्यागाला, असंख्य समाजधुरिणांच्या योगदानाला आणि संस्थेवर अखंड विश्वास ठेवणाऱ्या हजारो सभासदांना आहे. त्या विश्वासाचे जतन करणे आणि संस्थेचे हित सर्वोच्च मानून प्रत्येक प्रश्न मार्गी लावणे, हीच विद्यमान कार्यकारिणीची भूमिका आहे.



