सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’साठी ठक्कर डोम सज्ज; २८ ऑगस्टपासून भक्ती, संगीत आणि संतपरंपरेचा उत्सव
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; प्रवेश विनामूल्य, नाशिककरांसह भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’साठी ठक्कर डोम सज्ज; २८ ऑगस्टपासून भक्ती, संगीत आणि संतपरंपरेचा उत्सव
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; प्रवेश विनामूल्य, नाशिककरांसह भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे दि. २८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत ठक्कर डोम येथे ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, संगीत, कीर्तन, भजन आणि देशाच्या विविध भागांतील सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरांचा अनुभव देणाऱ्या या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही. त्यामुळे नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्ती-संगीताच्या पर्वणीचा आनंद घ्यावा, असे आवाहन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे.
तीन दिवसांचा कार्यक्रम
दिनांक वेळ कार्यक्रम
२८ ऑगस्ट दुपारी ४.३० मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
२८ ऑगस्ट सायं. ५.३० ते ७ प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन
२८ ऑगस्ट रात्री ८ ते १० श्री. राहुल देशपांडे यांची ‘अभंगवारी’
२९ ऑगस्ट सकाळी १० ते १२ भक्ती संमेलन – ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’
२९ ऑगस्ट दुपारी २ ते ४ भक्ती संमेलन – ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’
२९ ऑगस्ट सायं. ५ ते ७ ह.भ.प. डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन
२९ ऑगस्ट रात्री ८ ते १० कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम
३० ऑगस्ट दुपारी ३ ते ८ श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंहजी हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन
३० ऑगस्ट सायं. ४ ते ५ मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण
३० ऑगस्ट सायं. ५ ते ७ ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन
दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणाची सुरुवात होईल. रात्री श्री. राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’चा कार्यक्रम होणार आहे.
संतपरंपरेवरील विचारमंथनासह भक्तिसादरीकरण
दि. २९ ऑगस्ट रोजी ‘भक्ती संमेलन’च्या माध्यमातून सिंहस्थ महाकुंभमेळा, संतपरंपरा आणि समरसता या विषयांवर विचारमंथन होणार आहे.
सकाळच्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असा असून ह.भ.प. श्री. पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात ह.भ.प. श्री. शिवाजी महाराज मोरे, श्री. ष. बृ. प्र. डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी, श्री. महंत श्रीमानस शास्त्री, श्री. सुदर्शन महाराज कपाटे, ह.भ.प. सौ. सुप्रियाताई साठे आणि ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज जगताप सहभागी होणार आहेत.
दुपारच्या सत्रात ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ या विषयावर चर्चा होईल. डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. ह.भ.प. श्री. राणा महाराज वासकर, ह.भ.प. डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, श्री. जनार्दन हरिजी महाराज, ह.भ.प. श्री. रामकृष्ण महाराज वीर, श्री. मंदार बुवा रामदासी आणि भागवताचार्य प. पू. महंत श्री. चिरडे बाबा यांचा सहभाग असणार आहे.
सायंकाळी ह.भ.प. डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांच्या कीर्तनानंतर रात्री कु. मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा संगम
महोत्सवाच्या अंतिम दिवशी, दि. ३० ऑगस्ट रोजी देशाच्या विविध भागांतील भक्ती आणि सांस्कृतिक परंपरांचे सादरीकरण होणार आहे. श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंहजी हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन, मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण आणि ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन असा कार्यक्रम राहणार आहे.
गुरबाणी शबद कीर्तन दुपारी ३ ते ८ या वेळेत होणार असून, सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. त्यानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी वाहतूक व पार्किंगचे नियोजन
महोत्सवासाठी अपेक्षित नागरिकांची उपस्थिती लक्षात घेऊन वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच उभी करावीत. तसेच वाहतूक पोलिस आणि कार्यक्रमस्थळी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे.
सायंकाळच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने गर्दीचा विचार करून नागरिकांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुरेसा वेळ ठेवून ठक्कर डोम येथे पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन
शबद कीर्तनाच्या वेळी उपस्थित भाविकांनी डोके झाकून ठेवावे, अशी विनम्र विनंती करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमस्थळी स्वच्छता, शिस्त आणि पावित्र्य कायम राहावे यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम हा नाशिककरांसाठी भक्ती, संगीत आणि भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेण्याची विशेष पर्वणी आहे. नाशिककरांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्याची शोभा वाढवावी, असे आवाहन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे.
स्थळ : ठक्कर डोम, नाशिक
कालावधी : २८ ते ३० ऑगस्ट २०२६
प्रवेश : विनामूल्य; तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही



