पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात
दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती
मुंबई, दि. 23 :- जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील बाधित नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (मंत्रालय नियंत्रण कक्ष) येथील कक्षात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली.
मंत्रालय नियंत्रण कक्षात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे व्यवस्थापक विशेषकर सुर्यवंशी व कक्ष अधिकारी नितीन मसळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी मदतीकरिता मंत्रालय नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०२७९९०/२२७९४२२९ व भ्रमणध्वनी क्रमांक ९३२१५८७१४३ (वॉट्सअप क्रमांक) तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांक (टोल फ्री १०७०) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री.खडके यांनी केले आहे.
पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे
मुंबई, दि. 23 : पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी व वाहतूक समस्येवर तोडगा काढणे तसेच अतिरिक्त गर्दीची व्यवस्था करण्यासाठी श्री माता वैष्णो देवी (एसएमव्हीडी) कटरा येथून नवी दिल्लीकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचे तिकिट कटरा, उधमपूर आणि जम्मू रेल्वे स्थानकावर मिळेल.
रेल्वे क्रमांक : 04612
प्रस्थान स्थानक : श्री माता वैष्णो देवी कटरा
प्रस्थान वेळा :
कटरा – रात्री 21:20
उधमपूर – रात्री 21:48
जम्मू – रात्री 23:00
ही विशेष रेल्वे अतिरिक्त प्रवासी भार कमी करण्यात आणि नवी दिल्लीकडे सुरक्षित व आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. रामबन येथे राष्ट्रीय महामार्ग एकेरी वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. काश्मीर व जम्मू येथे अडकलेले प्रवाशी या विशेष रेल्वेने प्रवास करु शकतात. ही रेल्वे सकाळी 09:30 वाजता नवी दिल्लीला पोहोचेल.
प्रशासन सर्व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे तसेच आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.