रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचे सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला व रामकृष्ण घोष.
रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात
नाशिकचे सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला व रामकृष्ण घोष
नाशिक. जनमत. चंद्रकांत धात्रक यांच्याकडून. नाशिक क्रिकेटसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए – तर्फे, नव्या २०२४ -२५ हंगामासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला यांची महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबरोबरच मुळचा नाशिककर रामकृष्ण घोष देखील संघात निवडला गेला आहे.
डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव व सलामीचा फलंदाज मुर्तुझा ट्रंकवाला हे अनुभवी रणजीपटू आहेत. तर रामकृष्ण घोषने मागच्या हंगामात रणजी पदार्पण केले. सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी देखील पार पाडली आहे.
सत्यजित बच्छाव यंदाच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बळी घेत उत्कृष्ठ गोलंदाज सन्मान पर्पल कॅप चा मानकरी ठरला होता. सत्यजितने एकूण २५ बळी घेत वसंत रांजणे पर्पल कॅप चा बहुमान मिळवला.
सत्यजित बच्छावला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए- चे २०२२ वर्षा साठीचे सर्वोत्कृष्ट – बेस्ट – क्रिकेटपटू चे पारितोषिक मिळाले आहे . २०१८-१९ या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत सत्यजित बच्छावने सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता व महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. गेल्या २०२२ च्या हंगामात मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेच्या काही सामन्यांत सत्यजितने महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषवले होते. जानेवारी २०१६ तील सर्विसेस विरुद्ध कटक येथे सुरू झालेल्या ,आतापर्यंतच्या टी-ट्वेंटी च्या कारकिर्दीत सत्यजितने ४६ सामन्यातील ४५ डावात एकूण ६२ बळी घेतले असून १८ धावात ४ बळी हि त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मागच्या २०२२-२३ च्या हंगामात सत्यजितच्या नेतृत्वात त्याच्या अष्टपैलु खेळामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), नाशिकने विजेतेपद पटकावले होते.
मुर्तुझा ट्रंकवाला, नाशिकचा सलामीचा फलंदाज याचे महाराष्ट्र संघातर्फे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय- च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत २०२3-२4च्या हंगामात दमदार पुनरागमन झाले. संधी मिळताच विदर्भ संघा विरुद्ध दुसऱ्या डावात मुर्तुझा ट्रंकवालाने १२६ चेंडूत १५ चौकारांसह ८६ धावा केल्या. २०१७ सालीच मुर्तुझाचा महाराष्ट्र रणजी संघामध्ये पहिल्यांदा समावेश झाला होता. त्यावेळी पहिल्याच रणजी सामन्यामध्ये मुर्तुझाने शतक झळकावले होते व पदार्पणातच शतक झळकवणारा नाशिकचा पहिला खेळाडू ठरला होता. मुर्तुझा २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचाहि कर्णधार होता. मुर्तुझाने महाराष्ट्र संघातर्फे प्रथम श्रेणीच्या एकूण २२ सामन्यातील ३६ डावात ४ शतके व ५ अर्ध शतके यांसह आतापर्यंत एकंदर ११८१ धावा केल्या आहेत. मागील वर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), नाशिकने पुन्हा ९ वर्षांनी विजेतेपद पटकावले. या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत फलंदाजीत सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने पहिले स्थान पटकवताना ११ सामन्यातील १५ डावात ४ शतके व ६ अर्धशतकांसह तब्बल ९९८ धावा फटकावल्या. सर्वोच्च धावसंख्या होती १६७ . सरासरी ७६.७७, स्ट्राइक रेट ११३.२८. त्यात एकूण ३८ षटकार व १३८ चौकार .या स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुर्तुझाने बहुमोल शतकी कामगिरी करत १०२ धावा केल्या होत्या. त्यानंतर चाचणी सामन्यात देखील त्याने शतक झळकवले होते.
सुरुवातीपासून नाशिकमध्ये क्रिकेटचे धडे गिरवलेला रामकृष्ण घोष याने विविध वयोगटात नाशिकचे प्रतिनिधित्व केले आहे. गेली काही वर्षे तो पुण्यात खेळत आहे.
रणजी स्पर्धेच्या सरावासाठी महाराष्ट्र संघ कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत सहभागी झाला होता. यात महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला. यास्पर्धेत मुर्तुझा ने पाच सामन्यांमध्ये ५१५ धावा केल्या.
सत्यजित ने ३ सामन्यात १० बळी तर रामकृष्ण घोष ने ४ सामन्यात १८ बळी घेतले.
सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला व रामकृष्ण घोष यांच्या या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.