पालखेड डावा कालव्याच्या बिगर सिंचन आवर्तनाबाबत आवाहन*
*पालखेड डावा कालव्याच्या बिगर सिंचन आवर्तनाबाबत आवाहन*
*नाशिक, दिनांक 31 मे, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा):* पालखेड डावा कालव्याद्वारे मनमाड नगरपरिषद मनमाड, येवला नगरपरिषद येवला तालुक्यातील 38 गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मध्य रेल्वे मनमाड व ग्रामपंचायत आंबेगांव या शासनमान्य पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरवठा करण्यासाठी 1 जून 2024 पासून पालखेड डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. सदर आवर्तनाद्वारे देण्यात येणारे पाणी फक्त शासनमान्य बिगर सिंचन संस्था यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असून कोणीही सदर पाण्याचा शेतीसाठी किंवा इतर कारणांसाठी उपसा करू नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक वैभव भागवत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
सदर आवर्तन कालावधीत कालव्यालगतचा वीज पुरवठा खंडीत करणे, पोलीस बंदोबस्त पुरविणे याबाबत जिल्हाधिकारी नाशिक यांनी आदेश निर्गमित केले आहे. अनधिकृत पाणी उपसा करण्यांवर पाटबंधारे अधिनियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.