उसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी* *इमारत भाडे तत्वावर देणेसाठी प्रस्ताव सादर करावेत*
*उसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी*
*इमारत भाडे तत्वावर देणेसाठी प्रस्ताव सादर करावेत*
*नाशिक, दिनांक 5 फेब्रुवारी, 2024 ( वृत्तसेवा):*
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत उसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावार संत भगवानबाबा उसतोड कामगार मुला-मुलींची शासकीय योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी येवला तालुक्यात मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशी दोन वसतीगृह मंजूर झालेली आहेत. या दोन वसतिगृहासाठी सर्व सोई- सुविधांयुक्त इमारत भाडे तत्वावर घेणे प्रस्तावित आहे. तरी इच्छुक इमारत मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक, देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.
शासकीय वसतिगृहासाठी येवला तालुक्याच्या ठिकाणी खासगी इमारती भाडे तत्वावर घ्यावयाच्या आहेत. भाडेतत्वावर घेण्यात येणारी इमारत ही शैक्षणिक संस्थांच्या मध्यवर्ती ठिकाणी व मुला-मुलींच्या दृष्टीने सुरक्षित असावी. इमारतीचे क्षेत्रफळ मोकळ्या जागेसह प्रतिविद्यार्थी 100 चौ.फूट या प्रमाणे 100 विद्यार्थ्यांसाठी दहा हजार चौरसफूटापर्यंत इमारतीचे क्षेत्रफळ असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 10 विद्यार्थ्यांमागे 1 स्नानगृह व एक स्वच्छतागृह असावे.
याप्रमाणे निकष पूर्ण करीत असलेल्या इमारत मालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, पुणे- नाशिक महामार्ग या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत, असे मुख्याध्यापक, अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, बाभुळगाव,तालुका येवला यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.