शहीद जवान स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबाप्रती आदरभाव बाळगावा. अप्पर जिल्हाधिकारी दत्ता प्रसाद नडे.
दिनांक: 26 जुलै, 2022
*शहीद जवान, स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांप्रती आदरभाव बाळगावा*
*:अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे*
*कारगिल विजय दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता व पिता यांचा केला सन्मान*
*नाशिक: दिनांक 26 जुलै, 2022 (जिमाका वृत्तसेवा):*
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तिन्ही सैन्य दलातील जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या बलिदानची जाण ठेवून आपण सर्वांनी शहीद जवान माजी सैनिक, वीरपत्नी, वीर माता व पिता यांच्याप्रती नेहमीच आदरभाव बाळगावा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवनात 23 व्या कारगिल विजय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. नडे बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले, निवृत्त कमांडर विनायक अगाशे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अविनाश रसाळ, मानत कॅप्टन मार्तेंड दाभाडे, माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, वीरपत्नी, वीरमाता व पिता तसेच सैनिक कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे म्हणाले की, कारगिल युद्धाच्या वेळी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपल्या जवानांनी उर्त्स्फुतपणे सहभाग घेतला होता. यावेळी अनेक जवानांना वीर मरणही आले होते. शहीद जवानांचे हे बलिदान भावी पिढीपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. तसेच शहीद जवान, सैनिक कुटुंबीय, वीरमाता व पिता, वीरपत्नी यांना आपण सर्वांनी नेहमीच सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. जिल्हा सैनिक कल्याण विभाग आणि माजी सैनिक संघटनांनी सैनिकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी तसेच वीरपत्नींचे सक्षमिकरण करण्यासाठी बचतगट किंवा व्यवसाय सुरू करण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करावे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नेहमीच सहकार्य करण्यात येईल, असेही यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. नडे यांनी सांगितले.
*सैनिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणार: जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले*
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा उपयोग माजी सैनिक, वीरपत्नी व सैनिकांचे अवलंबित कुटुंबासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून करण्यात येतो. यासाठी आपल्या जिल्ह्याला डिसेंबर 2022 अखेर पर्यंत सशस्त्र सेना ध्वजनिधीचे संकलन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते उद्दिष्टे आपण जून 2022 मध्ये 200 टक्के पूर्ण केले आहे. या निधीचा उपयोग विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सैनिकांच्या कल्याणासाठी करण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी सांगितले आहे. आज याच निधीतून 8 लाख 28 हजार रूपयांच्या धनादेशाचे वाटप करून स्वतंत्र सैनिक, वीरपत्नी, वीरमाता व पिता यांना धनादेशाचे वाटप करून सन्मान करण्यात आला आहे.
*कल्याणकारी निधीतून यांना झाले धनादेशाचे वाटप*
कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना 8 लाख 28 हजार रूपयांची आर्थिक स्वरूपात मदत यावेळी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामध्ये प्रवासी वाहतूक बस खरेदी करून व्यवसाय सुरू करणाऱ्या सैनिक सावली महिला बचत गटास 3 लाख रूपये व वीर माता महिला बचत गटास 3 लाख रूपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पदरेशात शिक्षण घेण्यासाठी प्राजक्ता जगताप यांना 50 हजार रूपये, स्वत:चे घरकुल बांधण्यासाठी दत्तात्रय बागुल यांना 50 हजार रूपये, रेख नियोग यांना बी.डी.एसच्या शिक्षणासाठी 40 हजार रूपये, पुजा राठोड यांना अनाथ पाल्य विवाहासाठी 30 हजार रूपये, स्वप्निल कोर यांना एम.बी.ए. च्या शिक्षणासाठी 20 हजार रूपये, पुनम जुद्रें यांना एम. फार्म च्या शिक्षणासाठी 20 हजार रूपये, प्रेम देवरे यांना शिक्षणासाठी 18 हजार रूपयाच्या धनादेशांचे वाटप यावेळी करण्यात आले.