८५ वर्षांच्या वृद्धेला मृत्यूच्या दाढेतून आणले परत* *(नामको हॉस्पिटलने दिले जीवदान, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर काही क्षणात अँजिओप्लास्टी)*

*८५ वर्षांच्या वृद्धेला मृत्यूच्या दाढेतून आणले परत*
*(नामको हॉस्पिटलने दिले जीवदान, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर काही क्षणात अँजिओप्लास्टी)*
*नाशिक – हृदयविकाराचा तीव्र झटका आणि मिनिटाला ३० पर्यंत खाली आलेली हृदयगती अशा गंभीर अवस्थेतील वृद्ध महिलेला नामको हॉस्पिटलने जीवदान दिले. ही महिला दाखल झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत नामको हॉस्पिटलमधील पी. आर. धारिवाल कार्डिअॅक केअर सेंटरमधील डॉ. चेतन जैन यांनी पेसमेकर टाकून तिच्यावर प्रायमरी अँजिओप्लास्टी केली.*
*दिंडोरी येथील ८५ वर्षीय महिलेला तिच्या नातेवाईकांनी २८ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गंभीर अवस्थेत नामको हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चेतन जैन व हॉस्पिटलच्या टीमने केलेल्या तपासणीत हृदयाला होणारा रक्तपुरवठा थांबून हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे निदान झाले. यावेळी महिलेची हृदयाची गती अर्ध्याहून कमी झालेली होती. त्यामुळे महिला जवळपास बेशुद्धावस्थेत होती. महिलेचे वय आणि हृदयाची गती लक्षात घेता डॉक्टरांनी तातडीने हृदयगती नियमित करण्यासाठी पेसमेकर बसवून प्रायमरी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही मिनिटांत ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली. कुटुंबातील ज्येष्ठ महिलेला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून ओढून आणत जीवदान दिल्याबद्दल महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनोमन आभार मानले. अँजिओप्लास्टीच्या चार दिवसांनंतर प्राथमिक चाचण्या केल्यानंतर या महिलेला घरी सोडण्यात आले. गेल्या महिन्यात नामको हॉस्पिटलमधील पी. आर. धारिवाल कार्डिअॅक केअर सेंटरमधील तज्ज्ञांनी याचप्रकारे यशस्वीरित्या उपचार करत एका तरुणासह दोन युवकांचा जीव वाचवला होता.*