आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजन

*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी उत्साहात, विद्यार्थ्यांकडून मराठीचा जागर.

*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी उत्साहात, विद्यार्थ्यांकडून मराठीचा जागर*

*दि. २७ फेब्रुवारी, २०२३

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज दि. 27 फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाधरन डी., विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महापालिका आयुक्त श्री. पुलकुंडवार आणि पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी स्वतः दिंडी खांद्यावर घेतली.

ग्रंथदिंडीच्या अग्रभागी मनपाचा चित्ररथ होता. सुमारे ६०० विद्यार्थ्यांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग होता. विविध शाळांची कला पथक होते. लेझीम, ढोल वादनाने चैतन्य निर्माण झाले होते. झेंडा, झांज पथक, संबळ पथक, आणि विद्यार्थ्यांच्या लाठी-काठीच्या प्रत्यक्षिकांनी लक्ष वेधले. वारकरी, कीर्तनकार, विठ्ठल-रुक्मिणी, बहिणाबाई, मुक्ताबाई, शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, भगतसिंग यांच्या वेशभूषेत मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. मराठी भाषा, ग्रंथ यांची महती सांगणारे घोषवाक्याचे फलक हाती घेत तर काही विद्यार्थिनींनी ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथ आणि कळस, तुळशी वृंदावन डोक्यावर घेत मराठीचा जागर केला.

फुगड्या खेळत, भगव्या पताका उंचावत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सिव्हील हॉस्पिटल जिल्हाधिकारी कार्यालय, मेन रोड, शालिमार अशा मार्गाने ग्रंथ दिंडीचा प्रवास सुरू होता. शहरवासीयांनी या सुंदर सोहळ्याला दाद दिली.अनेक नागरिकांना दिंडीतील क्षणचित्रे मोबाईल मध्ये टिपण्याचा मोह झाला. प. सा. नाट्यगृहात मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीचा समारोप झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी राजभाषेचा कौतुक करणारा हा भव्य सोहळा कायमच संस्मरणात राहणार आहे.

या कार्यक्रमालामहसूल उपायुक्त रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मनपा शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर, विभागीय माहिती कार्यालय उप संचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, भीमराज दराडे, गणेश मिसाळ, अरविंद नरसीकर, तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव, अनिल दौंड, डॉ. विक्रांत जाधव, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाहक मकरंद हिंगणे, कोषाध्यक्ष दत्तप्रसाद निकम, सहकार्यवाह अरविंद ओढेकर, विश्वस्त राजेंद्र ढोकळे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, ‘सावाना’चे सचिव सुरेश गायधनी, सावाना’ चे सांस्कृतिक सचिव संजय करंजकर, बालभवन प्रमुख सोमनाथ मुठाळ उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे